पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३५
साहित्य, कला व विद्या
 

लेण्याची रचना साधारण अशीच असून त्यात अनेक जातककथांतील प्रसंग रंगविलेले आहेत. १९ क्रमांकाच्या लेण्यात सर्वात जास्त कोरीव काम आहे. त्यात बुद्धमूर्ती आहेत, अप्सरा आहेत; वेलपत्ती आहेत. नागराज व त्याची राणी यांच्या मूर्ती आहेत. या लेण्याला गंधकुटी असे नाव आहे.

वास्तुकला
 वाकाटकांनी जशी लेणी कोरविली तशीच अनेक मंदिरेही बांधली. प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे देवालय, रामगिरीवरील रामगिरीस्वामीचे देवालय, आणि अश्वत्थखेटकातील विष्णूचे देवालय यांचा उल्लेख त्यांच्या शिलालेखात येतो. प्रवरसेनाने प्रवरपूर येथे श्रीरामचंद्राचे एक उत्तुंग देवालय आपल्या मातेकरिता बांधले होते. ही सर्व देवालये आता अवशेषरूपातच दिसतात. पण तेवढ्यावरून त्यांच्या सौंदर्याची व भव्यतेची कल्पना येते. श्रीरामचंद्राच्या देवालयातील काही शिल्पपट्ट आता उत्खननात सापडले आहेत. एक शिल्पपट्ट भरतभेटीचा आहे आणि रामायणात वर्णन केल्याप्रमाणेच राम, लक्ष्मण, सीता, भरत यांच्या मुद्रेवरील भाव दर्शविण्यात कलाकाराला अपूर्व यश आलेले आहे. दुसरा शिल्पपट्ट वालीवधाचा आहे. त्यांतील भावदर्शनही असेच सुरेख आहे.
 यावरून सातवाहन कालानंतर स्थापत्य, चित्र व शिल्प या कलांत परागती झालेली नसून वाकाटक काळात, त्यांच्या आश्रयाने प्रगतीच झालेली आहे, असे दिसून येते.

चालुक्य
 बदामीचे व कल्याणीचे - म्हणजे पूर्व व उत्तर- चालुक्य यांची कीर्ती त्यांच्या राजकीय कार्यापेक्षा सांस्कृतिक कामगिरीमुळेच अधिक झाली, असे कोणी म्हणतात. दोन्ही घराणी मिळून, भारतातील विस्तीर्ण प्रदेशावर चालुक्यांची सत्ता ४०० वर्षे चालू होती. तेवढ्या काळात भारतात साहित्य आणि विविध कला यांची चांगलीच जोपासना झालेली दिसते. अजंठा येथील काही प्रसिद्ध भित्तिचित्रे चालुक्य राजांच्या प्रेरणेमुळे निर्माण झालेली आहेत. चालुक्यांच्या काळी कोरीव कलेचीही प्रगती झालेली होती. बदामीजवळच्या पहाडात वैष्णव व जैन मंदिरे कोरलेली आहेत. त्यांतील विष्णुमंदिर मंगलीशाच्या वेळी कोरलेले असून त्याचे शिल्पकाम अगदी अद्भुत आहे. स्थापत्यकलेच्या दृष्टीने तर चालुक्यांची कामगिरी इतकी भव्य आहे की त्या काळी निर्माण झालेली नवीन शिल्पशैली चालुक्य शैली या नावानेच ओळखली जाते. या शैलीत इंडोआर्यन व द्रवीड या दोन शिल्पकलांचे मिश्रण असून त्याशिवाय काही नवीन कल्पनाही दिसतात. नक्षीदार उंच शिखरे, गोल गुळगुळीत स्तंभ, घुमटाकृती छते, सुरेख मूर्ती व सुंदर भिंती ही त्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत.