पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२३४
 

आहेत. म्हणजे या लेण्यांच्या मागे सातवाहन नृपतींची ऐहिक प्रेरणा आहे. प्रतिमा आता भग्न झालेल्या असून प्रतिमांवर कोरलेली नावे, आणि महाराणी नावनिका हिचा लेख अजून शिल्लक आहे. सातवाहन नृपतींनी घडविलेले सार्वजनिक स्थापत्याचे हे पहिले उदाहरण आहे.

अजिंठा
 अजिंठ्याला कोरीव कला आहेच. पण तेथे चित्रकलाही आहे. त्यामुळे या लेण्यांचे महत्त्व विशेष आहे. लेणे क्र. १० मध्ये बोधिवृक्षाला वंदन करण्यासाठी निघालेला राजा व त्याचा परिवार याचा रंगपट आहे. राजा व त्याचे दासदासी यांच्या मुद्रेवरील भाव फार सुंदर साधले आहेत. या परिवारात एक नृत्यांगना आहे. तिचे चित्र रंगविण्यात कलाकाराने आपले सर्व कसब पणाला लावलेले आहे. सर्पिणीच्या वक्रतेने आपल्या देहाला या नृत्यांगनेने त्रिभंग गिरकी दिली आहे. या चित्रावरून व तिच्याच शेजारी असणाऱ्या एका वाद्यांगनेवरून त्या काळीही नृत्य व वादन कला किती प्रगल्भतेला गेली होती हे कळून येते. या लेण्यात षड्दंत जातकातील एक कथा अत्यंत हळुवारपणे चितारलेली आहे.

सातवाहन काल
 अजिंठ्याची कोरीव लेणी व तेथील चित्रकला यांना इ. पू. पहिल्या शतकात प्रारंभ झाला आणि ते काम इ. सनाच्या सातव्या शतकापर्यंत चालू होते. वरील क्र. १० चे लेणे सातवाहन कालचे आहे; तर क्र. १६, १७, व १९ ही लेणी वाकाटकांच्या काळची (२५०-५५०) आहेत. ही तीनही लेणी भारतातल्या कोणत्याही लेण्यापेक्षा जास्त सुंदर आहेत, असे बर्जेस या पाश्चात्य कलाकोविदाने म्हटले आहे. समोर मोठा व्हरांडा व आत मंडप अशी रचना आहे. व्हरांड्यात व मंडपातही मोठे स्तंभ असून त्यांवर कोरीव काम केलेले आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरवाहन गंगेची मूर्ती खोदलेली आहे. मंडपात एका ठिकाणी गंधर्व-अप्सरांचे मिथुन कोरलेले आहे. मंडपात चैत्यगृह असून तेथे भगवान बुद्धाची मूर्ती, धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेत, सिंहासनावर बसलेली, दाखविलेली आहे. अंतर्भागात भिक्षूंसाठी सोळा खोल्या खोदल्या आहेत. कोरीव कामाप्रमाणे येथील चित्रकामही फार सुंदर आहे. येथील बहुतेक चित्रे बुद्धाच्या शेवटच्या जन्मातील प्रसंगांविषयी आहेत. एका चित्रात राजा अजातशत्रू बुद्धाच्या दर्शनास जात असल्याचे दाखविले आहे. शेवटचे चित्र एका सुंदरीचे आहे. तिचा पती भिक्षू झाल्याचे कळताच तिला अतीव दुःख झाले. ग्रिफीथ हा समीक्षक म्हणतो की 'शोक, कारुण्य आणि कथाकथनाची पद्धत या बाबतींत या चित्राला मागे टाकणारी कृती कलेच्या इतिहासात सापडणार नाही. फ्लॉरेन्स, व्हेनिस येथल्या चित्रकारांना यापेक्षा जास्त चांगले भावदर्शन साधले नसते.' सतरा क्रमांकाच्या