पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३३
साहित्य, कला व विद्या
 

आणि बेडसे इतक्या ठिकाणी आणि नाणे घाटात ही लेणी आहेत. यांतील एक नाणे घाटातील लेणे वगळता बाकी सर्व लेणी ही बौद्धांची आहेत. म्हणजे ती धर्मप्रेरणेने झालेली आहेत. विहार आणि चैत्य असे या लेण्यांचे द्विविधरूप प्रामुख्याने दिसते. विहार म्हणजे बौद्धभिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याच्या जागा. मध्यभागी दीर्घ चौकोनी जागा आणि तिच्या तीन्ही बाजूला कोरून काढलेल्या खोल्या. (प्रत्येक खोलीत एकेक दगडी बाक असते.) यात भिक्षूंनी राहावयाचे. दुसरा प्रकार म्हणजे चैत्य. हे बौद्धांचे पूजास्थान होय. मध्यभागी एक विस्तीर्ण मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला चौकोनी, षट्कोनी किंवा अष्टकोनी खांब, मंडपाच्या मध्यभागी बुद्धाच्या अवशेषांवर उभारलेला स्तूप, त्याच्या भोवती प्रदक्षिणा पथ अशी चैत्याची रचना असते.

दर्शनी भाग
 दर्शनी भागावर कमानी कोरलेल्या आहेत. आणि आतील स्तंभावर सिंह, वाघ, घोडे यांच्या प्रतिमा, पक्ष्यांच्या प्रतिमा, यक्षांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. हे कोरीव काम इतके सुरेख व नाजूक आहे की हे पशुपक्षी, ही माणसे आता आपल्या देखत हालचाली करतील असे वाटते. इतका जिवंतपणा त्यांच्यात आहे.

कार्ले, नाशिक
 महाराष्ट्रातील ही लेणी महाराष्ट्रीय कलावंतांनीच कोरलेली आहेत. महाराष्ट्रातील राजे, महारठी, महाभोज, सार्थवाह, श्रेष्ठी, गृहपती, सुवर्णकार, त्यांच्या घरधनिणी यांच्या आश्रयाने ते कलावंत राहात. सुमारे अडीचशे शिलालेख या लेण्यांमध्ये आहेत. त्यांतच ही माहिती दिलेली आहे. कार्ले येथील लेणे वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने कोरविले आहे. आणि जंबुद्वीपातील सर्वांत उत्तम शैलगृह असे जे शिलालेखात त्याने म्हटले आहे, ते अगदी सार्थ आहे. नाशिक येथील लेणे क्र. १९ हे सातवाहन नृपती कन्ह याच्या राजवटीतले आहे. महाक्षत्रप नहपान व त्याचा जावई उपवदात आणि मुलगी दक्षमित्रा यांचे कोरीव लेख क्र. १४ व १० यांत आहेत. लेणे क्र. ३ हे गौतमीपुत्र सातकर्णी याची माता महादेवी गौतमी बलश्री हिने कोरविले असून तेथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या महापराक्रमाचे वर्णन तिने केलेले आहे. या लेण्याला गौतमीपुत्र विहार असे म्हणतात. या विहाराच्या दोन्ही बाजूंस खोदीव चौकटी आहेत. ही सर्व बौद्ध कला होय.

नाणे घाट
 नाणे घाटातील लेणी हा अपवाद आहे. प्राचीन काळी कोकण आणि देश यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे नाणे घाट. तेथे बारीक बारीक अनेक लेणी आहेत. एका मोठ्या लेण्यात एका विस्तीर्ण दालनात सातवाहन कुलातील राजपुत्रांच्या प्रतिमा