पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२३२
 

शाकुंतल, रघुवंश यांच्याप्रमाणे वंद्य मानावी अशी वाङ्मयकृती महाराष्ट्रात या काळात झाली नाही. गाथासप्तशतीबद्दल कोणी तसा अभिमान वाहतात. पण ती एकजिनसी अशी काव्यकलाकृती नाही. एका राजाने केलेले ते संकलन आहे. एकहाती, एकजिनसी कलाकृतीची सर तिला येणार नाही. पण साहित्याच्या बाबतीत हा कमीपणा असला तरी वास्तू, शिल्प, मूर्ती आणि चित्र या कलांच्या बाबतीत मात्र तसे नाही. अखिल भारताने, इतकेच नव्हे, तर अखिल जगताने, मस्तक नम्र करून अभिवादन करावे अशा कलाकृती अजंठा, वेरूळ, घारापुरी, रामटेक येथे भारतीय कलाकारांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. वेरूळ अजिंठ्याच्या कोरीव कलेला आणि चित्रकलेला आजही जगात तोड नाही. कोरीव कला ईजिप्त, असीरिया, रोम, ग्रीस येथेही होती. पण महाराष्ट्रातील वेरूळ अजिंठ्याच्या कलेची सर यांपैकी कोणत्याही देशातील कलेला येत नाही.
 आता आपण या कलांचा इतिहास सातवाहन, वाकाटक इ. महाराष्ट्रातील राजघराण्यांच्या कालखंडांच्या क्रमाने पाहू.

वैभवशाली
 सातवाहन कालात नागरी जीवन समृद्ध होते. अर्थात उत्तम वास्तुकला हस्तगत झाल्यावाचून अशी समृद्धी येत नाही, हे उघड आहे. आज उत्खननात जे अवशेष सापडले आहेत त्यावरून पाहता त्या काळी भाजलेल्या पक्क्या विटांची व कौलांनी आच्छादिलेली उत्तम घरे बांधण्याची कला हस्तगत झालेली होती, हे स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे वेषभूषेच्याही कलेत उत्तम प्रगती झालेली दिसून येते. स्त्रियांचे कर्णभूषणे, केशभूषणे, बाहुभूषणे, गळ्यातले, पायातले, कमरेचे- सर्व प्रकारचे दागिने तेव्हा घडवीत असत. आणि सर्व प्रकारची प्रसाधने वापरून स्त्रिया आपले सौंदर्य नटवीत असत. गाथासप्तशतीतील वस्त्रांच्या वर्णनावरून हेच दिसते. अंकुश, दुकूल, निवसन, पट, पटक, पट्टांशुक, साऊली, सिचय, अशी नावे स्त्रियांच्या नेसत्या वस्त्रांची, आणि कंचुकी, कंचुकिका, कूर्पास ही स्तनांशुकांची नावे सप्तशतीत आढळतात. या अनेक नावांवरूनच ते जीवन साधे, प्राथमिक नसून चांगले समृद्ध व वैभवशाली होते हे उघड आहे.
 पण वस्त्रालंकार, घरे ही कला असली तरी ती साधी कला होय. चित्र, शिल्प, मूर्ती या खऱ्या श्रेष्ठ कला होत. तेव्हा सातवाहन कालातील या कलांचे स्वरूप आता पाहू.

लेणी
 सातवाहन कालातील शिल्पकला, आणि चित्रकला ही सर्व पर्वतांतून कोरलेल्या लेण्यांमध्ये दृष्टीस पडते. कोंडाणे, भाजे, पितळखोरे, अजिंठा, नाशिक, जुन्नर, कार्ले