पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२७
साहित्य, कला व विद्या
 

राजपुत्राचे नाव हरपाळदेव असे होते. त्याला जुगाराचे व्यसन होते. त्या पायी कफल्लक होऊन त्याने घर सोडले. इ. स. ११८५ साली ऋद्धिपूर येथे गोविंदप्रभू तथा गुंडम राऊळ यांचे शिष्यत्व त्याने पत्करले. त्यानंतरही त्याने दोन लग्ने केली. पण शेवटी वैराग्य येऊन त्याने संसार सोडला व तो महाराष्ट्रात आला. १२६३ साली त्याला श्री दत्तात्रेयाचे दर्शन झाले व मग त्याने पंथाची स्थापना केली व संन्यास- दीक्षा घेतली. चक्रधरस्वामींच्या पंथाला महानुभाव, महात्मा, जयकृष्णीय, अच्युत पंथ अशी निरनिराळी नावे आहेत. त्यांतील 'महानुभाव' या नावानेच तो ओळखला जातो.
 हा पंथ पूर्ण निवृत्तिवादी असून द्वैतमताचा पुरस्कर्ता आहे. हंस, दत्त, श्रीकृष्ण व चक्रधर हे चार अवतार पंथ मानतो. यांतील दत्त हा त्रिमुखी नसून एकमुखी आहे. तो विष्णूचा अवतार आहे.

प्रमाण ग्रंथ
 'सिद्धान्तसूत्रपाठ ' (चक्रधरांच्या उक्ती), 'भगवद्गीता' आणि 'भागवत' हे तीन ग्रंथ पंथ प्रमाण मानतो. वेद मानीत नाही. कृष्ण उपासना, संन्यास, द्वैतवाद, भिक्षावृत्ती, कपायवस्त्रे ही या पंथीयांची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
 चक्रधरांच्या मते मोक्ष, कर्मानुष्ठान याला महाराष्ट्राइतका योग्य असा दुसरा देश नाही. सात्विकता, सुखरूपता, निर्दोषत्व, गुणसंपन्नता हे गुण येथे त्यांना दिसून आल्यामुळे, आपल्या पंथाचा प्रचार त्यांनी महाराष्ट्रातच केला. अर्थातच पंथाचे सर्व वाङमय मराठीतच आहे.

सिद्धान्तसूत्रपाठ
 'सिद्धान्तसूत्रपाठ' हा महानुभावांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ. यात चक्रधरांच्या उक्ती आहेत. त्यांचा शिष्य महीन्द्रभट याने ही वचने लिहून ठेविली. त्यांचा दुसरा शिष्य केशवसूरी याने त्यांतील काही निवडून हा ग्रंथ तयार केला. त्यात एकंदर १६०९ सूत्रे आहेत. आचार्यसूत्रे ती हीच. महानुभावीयांना हा ग्रंथ वेदाइतकाच पूज्य आहे. 'लीळाचरित्र' हा दुसरा ग्रंथ. हा महीन्द्रभटाने रचला आहे. हे चक्रधरांचे चरित्र आहे. यात त्याच्या एकंदर १५०९ लीळा दिलेल्या आहेत. 'दृष्टान्तपाठ' हा असाच महत्त्वाचा ग्रंथ आहे. यातील मूळ सूत्रे व त्यांवरील दृष्टान्त हे चक्रधर- स्वामींनी सांगितलेले आहेत. त्यांवर दार्ष्टान्तिके लिहून हा ग्रंथ केशवराजसूरी अथवा केसोवास याने इ. स. १२८० च्या सुमारास तयार केला. यात एकंदर ११४ दृष्टान्त असून त्यांत चक्रधरांचे सर्व तत्त्वज्ञान आलेले आहे.