पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२१
साहित्य, कला व विद्या
 

काळातील मराठी साहित्य अशा क्रमाने या महाराष्ट्रीय साहित्याचा इतिहास आपल्याला पाहावयाचा आहे.

गाथासप्तशती
 सातवाहन काळी महाराष्ट्राची महाराष्ट्री ही भाषा होती हे मागे अनेक प्रमाणे देऊन सांगितलेच आहे. या महाराष्ट्रीतला अगदी पहिला आणि महत्त्वाच्या दृष्टीनेही अग्रगण्य असा काव्यग्रंथ म्हणजे 'गाथासप्तशती-' 'गाहासत्तसई' हा होय. सातवाहन राजा हाल याने इ. सनाच्या पहिल्या शतकात याचे संपादन केले. हा ग्रंथ त्याने स्वतः रचलेला नाही. हे सलग, सबंध असे काव्य नाही. त्या काळी लोकांच्या, विशेषतः ग्रामीण जनतेच्या, मुखी असलेल्या सातशे गाथांचा म्हणजे श्लोकांचा हाल राजाने केलेला हा संग्रह आहे. यामुळेच, हे त्या काळच्या सर्व महाराष्ट्राचे काव्य आहे, असे म्हणतात. सर्व महाराष्ट्राच्या जीवनाचे दर्शन यात घडते ते यामुळेच.

शृंगार रस
 या काव्यातील मुख्य रस शृंगार हा आहे. आणि पुरुषाच्या भावना, स्त्रीच्या भावना, मुग्धा, प्रौढा यांच्या भावना, एकनिष्ठ प्रेम, व्यभिचारी प्रेम अशा शृंगार रसाच्या सर्व छटा या गाथांतून दृष्टीस पडतात. पण एक गोष्ट चटकन ध्यानात येते ती ही की गाथासप्तशतीत जास्त भर व्यभिचारी शृंगारावर आहे. एकनिष्ठ प्रेम, पतिव्रतांचे प्रेम यात नाही असे नाही. पण अशा गाथा मधून मधून आढळतात. बहुसंख्य गाथा व्यभिचारी शृंगारच्याच आहेत. याचा असा एक चमत्कारिक परिणाम झाला आहे की टीकाकारांनी ज्या गाथांत व्यभिचार भाव नाही त्यांचाही अर्थ वाटेल ती ओढाताण करून, कल्पना लढवून, व्यभिचारदर्शक असाच लावला आहे.
 'शरद् ऋतूतील शुभ्र चांदणे, कांडलेल्या नव्या तांदळाप्रमाणे, स्वच्छ दिसते. धान्याची समृद्धी झाल्यामुळे अशा चांदण्या रात्री गरीबसुद्धा स्वच्छंदाने गाणी गातो.' या गाथेत (६८९) निसर्गाचे उत्तम वर्णन आहे. आणि नेहमीच्या ठरीव संस्कृत उपमा टाकून कांडलेल्या तांदळाची उपमा दिल्यामुळे त्याला ग्रामीण जिवंतपणा आला आहे. पण याही गाथेत, 'नवरा चांदण्यामुळे शेतावर गेला आहे, तेव्हा रान मोकळे आहे' असा ध्वनित अर्थ टीकाकारांनी शोधून काढला आहे.
 सोज्ज्वळ शृंगाराचे एक उदाहरण देतो. 'लग्नाचे वेळी गायिका मंगल गीते गात आहेत. आणि जणू त्यामध्ये होणारा पतीच्या नावाचा उल्लेख ऐकण्याकरताच नववधूच्या अंगावर रोमांच उत्सुकतेने उभे ठाकले आहेत. '
 शृंगारवर्णनाबरोबरच निसर्गवर्णने, प्राण्यांची वर्णने, शिकारीची वर्णने या गाथांत आली आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन त्यांतून घडते हे म्हणणे सार्थ ठरते.