पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१९
आर्थिक जीवन
 

उपभोग घेत होता यात शंका नाही. यादवांच्या उत्तरकाळात हे सर्व खालावू लागले. समुद्रगमननिषेध, निवृत्तीचे प्राबल्य, कर्मकांडाचे प्राधान्य इ. याची अनेक कारणे आहेत. त्यांची चर्चा अन्यत्र केलेलीच आहे. यादव काळाअखेर मुस्लिमांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या होऊ लागल्या व थोड्याच काळात सर्व दक्षिण हिंदुस्थान परक्यांच्या भक्ष्यस्थानी पडला. यामागे जी कारणे तीच आर्थिक जीवन खालावण्यामागे आहेत. पण तो अखेरीचा पडता काळ सोडला तर सातवाहन ते यादव हा दीर्घ कालखंड आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राचा वैभवाचा काळ होता असे म्हणण्यास चिंता नाही.