पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२१८
 

प्रसंगी सधन व्यापारी आणि सावकार राजाला मुबलक द्रव्यसाहाय्य करीत. यामुळे महासामंतांना मिळणाऱ्या सवलती, त्यांना मिळणारी दरबारमान्यता, छत्रचामरांचा मान हे सर्व वैभव सेठींनाही राजांकडून मिळत असे, यात नवल नाही.

वजनमापे
 हल्लीप्रमाणेच त्या वेळीही निरनिरळ्या प्रकारची वजनेमापे प्रचलित होती. धान्य मोजण्यासाठी कुडव, शेर, दुशेरी, पासरी, मण, खडी ही मापे होती. गुंज, वाल, मासा, तोळा अशी वजने सोन्याचांदीसारख्या मौल्यवान वस्तूंसाठी होती. या वजनमापामध्ये कोणी लबाडी केल्यास किंवा पदार्थात भेसळ केल्यास स्मृतींमध्ये त्याला शिक्षा सांगितलेल्या आहेत.

विनिमय
 पुष्कळसा विनिमय त्या वेळी ऐनजिनसी होत असे. वस्तू देऊन वस्तू विकत घेत. पण नाण्यांनीही पुष्कळ व्यवहार होत असे. यादवांच्या काळी महाराष्ट्रात सोन्या- चांदीची व तांब्याची नाणी प्रचलित होती. द्रम्म, होन, निष्क, सुंक, रुका, कवडा अशी नाण्यांची नावे कोरीव लेखांत आढळतात. ( यादवकाळातील माहिती - यादव-कालीन महाराष्ट्र, मु. ग. पानसे )
 सातवाहन ते यादव या दीड हजार वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे आर्थिक जीवन कसे होते याची वरील वर्णनावरून कल्पना येईल. नगरे आणि खेडी असे दोन मुख्य विभाग आताप्रमाणे तेव्हाही होते. खेड्यात मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आणि नगरात व्यापार आणि वरच्या दर्जाचे उद्योग. खेड्यातही शेतकऱ्यांखेरीज लोहार, सुतार, चांभार यांचे उद्योग चालत. पण ते कारागिरीच्या रूपाचे होते. आणि शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यापलीकडे त्यांची मजल जात नसे. नगरातील व्यापारी आणि उद्योगपती यांचे जीवन संघटित असून सर्व देशाच्या जीवनात त्यांना फार महत्त्वाचे स्थान होते. त्या काळी महाराष्ट्राचा व्यापार सर्व हिंदुस्थानभर तर चालेच, पण इजिप्त, अरब देश, रोम, जावा, सुमात्रा येथपर्यंतही येथला माल जात असे व तेथला येथे येत असे. शेतीमध्ये तांदूळ, गहू, कापूस, ऊस, कडधान्ये, गळिताची धान्ये अशी सर्व तऱ्हेची पिके होत. आणि ती बहुधा पावसावरच अवलंबून असे. विहिरी, तलाव यांची जोड त्याला मिळे. पण धरणे, कालवे यांचा आढळ फारसा होत नाही. सोने, चांदी, तांबे यांच्या खाणी विपुल होत्या. रत्नमाणकांच्याही होत्या. आणि मोत्यांची पैदासही होत असे. यावरून येथे समृद्धी होती हे स्पष्ट असले तरी श्रीमंत व गरीब आणि नागरी व ग्रामीण असा भेद तितकाच स्पष्टपणे दिसून येतो.
 एकंदर संस्कृतीच्या दृष्टीने विचार करता शेती, उद्योग व व्यापार या तिन्ही दृष्टींनी तत्कालीन भारतात व जगातही महाराष्ट्र हा पहिल्या दर्जाच्या आर्थिक जीवनाचा