पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१७
आर्थिक जीवन
 

मही सांगून ठेवलेले आहेत. मालाची देवाणघेवाण, भांडवलाचा पुरवठा यासाठी व्यापाऱ्यांच्या सहकार्याची गरज होती. त्याचप्रमाणे माल घेऊन लांबच्या रस्त्याने जाताना चोरदरोडेखोरांपासून संरक्षण करण्यासाठीही हे सहकार्य अवश्य होते. म्हणून या श्रेणी प्रथम निर्माण झाल्या व टिकून राहिल्या. अनेक श्रेणींना स्वतंत्र सैन्य ठेवण्यासाठी राजांनी परवानगी दिलेली असे. डंबळ येथील वीखळंजु सेठीच्या श्रेणीला सन १०९५ च्या सुमारास सम्राट जगदेक मल्ल याने छत्र आणि चामर वापरण्याचा बहुमान दिला होता. प्रत्येक श्रेणीचा स्वतंत्र ध्वज असे व प्रवासात सैन्याप्रमाणेच तो पुढे डौलाने मिरवत असे.
 स्मृतीप्रमाणेच कोरीव लेखांवरूनही श्रेणींविषयी माहिती मिळते. कापड, भुसार माल, जवाहीर इ. माल विकणारे व्यापारी, सुतार, कुंभार, सोनार, शिंपी, गवंडी, तेली इ. कारागीर यांच्या श्रेणी असत. यावरून सामान्यतः एका श्रेणीत एकाच जातीचे लोक असत असे दिसते. तरी त्या काळी भिन्न जातीचे लोक एकच धंदा करीत असेही मिताक्षरेवरून दिसते, कारण श्रेणीत निरनिराळ्या जातींतील लोकांचा समावेश होतो, असे तिने सांगितले आहे.
 लक्ष्मेश्वर येथील सन ७७५ च्या लेखात विणकरांच्या श्रेणीचा उल्लेख आहे. मुळगुंद येथील सन ८८० च्या लेखात ३६० शहरांत कामाचा व्याप असलेल्या श्रेणीचा उल्लेख आहे. अकराव्या शतकातील लेखात एकंदर तेरा श्रेणींचा उल्लेख आहे. त्यांतील काही कोल्हापूर, मिरज येथील आहेत; तर काही म्हैसूर कोईमतूरपर्यंत पसरलेल्या आहेत.

श्रेणी लोकाभिमुख
 या श्रेणींना समाजात फार महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्यामुळे संपत्तीची अभिवृद्धी होत असे, हे तर कारण आहेच. पण मुख्य कारण म्हणजे त्यांची लोकाभिमुख वृत्ती हे होय. मंदिरे, मठ, धर्मशाळा यांना या श्रेणी उदार देणग्या देत. बेळगाव जिल्ह्यातील कुरंबेट्ट येथील वणंजूंनी चामुंडराजाने बांधलेल्या देवळास देणग्या दिल्या आणि मल्लेश्वर या देवतेला काकती हे नगर व इतर काही जमीन लिहून दिली. मिरजेच्या वीरवणंज कार्यकारिणीने माधवेश्वराच्या देवस्थानास दान दिल्याचा लेख आहे. खानदेशातील पाटणच्या मठाला अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख ताम्रपटात आहेत. विक्रेता आपल्या मालातील ( धान्य, तेल, इ. वस्तूंतील ) काही भाग देई, तसाच खरेदी करणाराही देई. श्रेणींची अशी वृत्ती असल्यामुळे नागरिक गावच्या कारभाराची बरीच जबाबदारी सेठींवर सोपवीत आणि त्याला सरकार मान्यताही मिळे.
 लोकांना जसे श्रेणींचे साह्य होत असे तसे राजांनाही होत असे. श्रेणींना स्वतंत्र सैन्य ठेवण्याची परवानगी असे. त्या सैन्याचा अनेक वेळा युद्धप्रसंगी राजांनाही उपयोग होत असे. आणखी दुसरा उपयोग म्हणजे पैसा. युद्धाच्या किंवा इतर आपत्तीच्या