पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२१६
 

कसबी सुतार त्या उद्योगात गुंतलेले होते. बैलगाडी हे खुष्कीच्या वाहतुकीचे मुख्य साधन असल्यामुळे तोही उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असे.
 देवगिरी ही यादवांची राजधानी. तेथे हिरेमाणकांना पैलू पाडणे आणि सोन्या- चांदीची व इतर कलाकुसरीची कामे करणे हा मोठा उद्योग चालत असे.

व्यापारी पेठा
 इतके उद्योग येथे चालत तेव्हा त्यांचा व्यापारही तशाच मोठ्या प्रमाणात असला पाहिजे हे उघड आहे. सातवाहनाच्या काळापासून जे भिन्न राजवंश महाराष्ट्रात झाले त्यांच्या राजधान्या म्हणजे मोठी नगरे होती. चांदोर, सिन्नर व देवगिरी अशा यादवांच्याच क्रमाने तीन राजधान्या झाल्या. शिवाय नाशिक, एलिचपूर, कोल्हापूर, माण, लातूर, मलखेड, ठाणे, कल्याण, चौल, गोवे इत्यादी देशावरची व कोकणातली कित्येक नगरे या वा त्या कारणांनी प्रसिद्धीस आली होती. बहुतेक सर्व शहरांभोवती कोट बाधलेले असत. त्यामुळे संरक्षणाची व्यवस्था चांगली होती. ही सर्व शहरे व्यापाऱ्यांनी आपल्या पेठा करून टाकली होती. यांत देवगिरी ही अर्थातच प्रमुख पेठ होती. या सर्व पेठांचा मोठा व्यापार सर्व भारतभर चालत असे, असे मार्कोपोलोच्या वृत्तावरून दिसते.

सर्व भारतात
 गुजराथ, तेलंगण, कर्नाटक हे प्रांत तर महाराष्ट्राच्या सीमेचे प्रांत, पण त्यांच्या शिवाय केरळसारख्या दूरच्या प्रदेशांशी सुद्धा महाराष्ट्रीय व्यापाराचे दळणवळण सतत चालू होते. गंगा तटाकीचे ( गोदातटाकीचे ) चारे म्हणजे व्यापारी गुजराथेत आपले कापड विकीत असत. मिरजेचे व्यापारी तेलंगणात माल नेत. बळगावे ही त्यावेळी एक प्रचंड बाजारपेठ होती. तेथे सर्व व्यवहाराला एकसूत्रता यावी म्हणून एखाद्या व्यापाऱ्याची प्रमुख निवड केली जात असे. समय चक्रवती जयपती सेठी हा एकदा प्रमुख असल्याचा उल्लेख सापडतो. या पेठेत सोने, कापड, तेल, कापूस, तांदूळ, गूळ, सुगंधी द्रव्ये, हळद, हिंग, मिरे, ऊस, कडबा, असा नाना प्रकारचा माल खपविण्यासाठी व म्हशी, बैल, घोडे या जनावरांच्या खरेदीविक्रीसाठी व्यापाऱ्यांची अखंड ये-जा चालू असे. मिरज, कोल्हापूर याही मोठ्या पेठा होत्या. या सर्व पेठांतून सर्व भारतभर माल जात असे.

व्यापारी संघटना
 सातवाहनांच्या काळापासून व्यापाऱ्यांच्या संघटना बांधण्याची पद्धत होती, हे मागे सांगितलेच आहे. यादव काळाअखेरपर्यंत ती व्यवस्थित चालू होती. स्मृतीमध्ये या संघटनांना श्रेणी व पूग अशी नावे दिलेली आहेत. आणि त्यांच्या कार्यासंबंधी निय-