पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१५
आर्थिक जीवन
 

माहीत होते हे त्यांनी केलेल्या वर्णनांवरून दिसते. विविध अलंकार, वस्त्रे, देवळांच्या कमानी, सिंहासने, यांना शोभा आणण्यासाठी ही रत्ने वापरली जात. रत्नकारांच्या कौशल्याचे वर्णन मृच्छकटिकासारख्या नाटकात केलेले आढळते. श्रीमंतांच्या घरीच हे काम चाले असे दिसते.
 रत्नांप्रमाणेच मोतीही विपुल प्रमाणात होते. बृहत्संहितेत एकावली, नक्षत्रमाला असे मोत्यांच्या माळांचे अनेक प्रकार वर्णिले आहेत. अलंकारांप्रमाणेच तरवारीच्या मुठी, सुवर्णपात्रे, स्त्रियांची वस्त्रे यांवरही मोती बसविले जात असत.

बंदरे
 सातवाहन काळानंतर अनेक शतके अंतर्गत व बहिर्गत व्यापारही जोरात चालू होता. कल्याण हे त्या काळचे फार महत्त्वाचे बंदर होते. याशिवाय सोपारा, ठाणे, दाभोळ, जयगड, देवगड, मालवण ही बंदरे होतीच. कापड, सूत - तलम व भरड, मलमल, कातडी, गालिचे, नीळ, धूप, अत्तरे, नारळ, विड्याची पाने, चंदन, शिसवी, साग, तिळाचे तेल, हस्तिदंत हे निर्यातीचे मुख्य जिन्नस होते. आयातीचे जिन्नसही बरेच होते. सोने, चांदी, तांबे यांची आयात ठाणे बंदरातून होत असे. अरबस्थान, इराण, आफगाणिस्थान येथून उत्तम घोड्यांची आयात विपुल होई.

यादव - वस्त्रे
 आता यादव काळातील उद्योग व व्यापार यांचा विचार करावयाचा. या काळीही कापड हाच महाराष्ट्राचा प्रमुख उद्योग होता. येथे होणारे मलमली, मखमली, रेशमी वगैरे सर्व प्रकारचे कापड भारतामध्ये सर्वत्र जात असे; इतकेच नव्हे, तर परदेशातही त्याला खूप मागणी होती. फार पुरातन काळापासून वस्त्रे विणणे या उद्योगासाठी पैठण, नगर, ठाणे, चौल ही नगरे प्रसिद्ध होती. तेराव्या शतकात पैठण, ठाणे व चौल याची कीर्ती जगभर झाली होती. एकट्या ठाणे शहरात पाच हजार विणकर मखमलीचे कापड तयार करण्यात गुंतलेले असत. बऱ्हाणपूर येथे तयार झालेले कापड अरबस्थान, इराण, इजिप्त, पोलंड येथे जात असे. पैठणची पैठणी तर जगविख्यात होती. कोळ्याच्या जाळयातील तंतूइतके तिचे रेशमी धागे नाजूक, पण तारेसारखे भक्कम असत. आणि त्यावर बारीक नक्षीकाम केलेले असे. धोतरे, उपरणी, साड्या इ. सुती किंवा रेशमी वस्त्रे नळीत घालून ठेवण्याइतकी तलम असत.
 या खालोखाल चामडे कमावण्याचा धंदा महाराष्ट्रात चाले. मोटा, पखाली, पादत्राणे ही ठाणे बंदरातून परदेशातही रवाना होत.

जहाजे
 वसई येथे मालाची वाहतूक करणारी जहाजे बांधणारी गोदी होती. तेथे कित्येक