पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२१४
 

 शेतीवरील कर आकारणीची पद्धतही यादव काळी फारशी निराळी नव्हती. सारावसुली ऐनजिनसी होत असे. आणि पिकांची स्थिती पाहून कर आकारणी होत असे. सामान्यतः आठपासून पन्नास टक्क्यांपर्यंत पट्टी आकारण्यास धर्मशास्त्रज्ञांची संमती होती. पिकांची स्थिती कशी आहे हे ठरविण्याचे काम गावातल्या पंचांचे होते. साऱ्याची बाकी दोन वर्षांपलीकडे राहू देत नसत. दोन वर्षांहून जास्त सारा राहिला तर जमीन विकून तो वसूल करण्याचा अधिकार गावपंचांना होता. देवस्थाने, ब्राह्मणांना दिलेले अग्रहार या जमिनीवर बहुधा कर नसे. विशेष म्हणजे पाणीपट्टी त्या काळी नव्हती.
 शेतकरी, बलुतेदार, पाटील, देशमुख, कुळकर्णी यांची स्थाने, यांचे संबंध यांचे अधिकार हेही सातवाहन कालाप्रमाणेच बव्हंशी यादवकाळाअखेरपर्यंत होते. अर्थात एकंदर ग्रामव्यवस्थेचे स्वरूपही तेच राहिले असणार हे उघडच आहे.
 सातवाहन ते यादव या कालखंडातल्या शेतीची अशी अवस्था होती. यावरून समृद्धीबरोबरच दारिद्र्य व कष्टाचे जीवन हेही येथे होते असे दिसून येते.
 वस्त्रे विणण्याचा उद्योग फार प्राचीन काळापासून भारतात चालू होता. सातवाहन काळी ही कीर्ती टिकून होती हे आपण पाहिलेच आहे. पुढच्या काळाबद्दलही असेच म्हणता येईल. त्या वेळचे काव्य ग्रंथ, कोरीव लेणी, प्रवाशांची वर्णने यावरून, रेशीम, लोकर, कापूस, काही जनावरांचे केस आणि झाडाच्या साली यापासून विविध प्रकारची वस्त्रे येथे विणली व वापरली जात असत, अत्यंत भरड पासून कोळ्याच्या जाळ्याइतकी तलम अशी सर्व प्रकारची वस्त्रे येथे होत, वस्त्रांना रंगही नाना तऱ्हेचे दिले जात असत, हे दिसून येते.
 कातडी कमावणे व त्याच्या पादत्राणे, बुधले पखाली, पंखे अशा विविध वस्तू बनविणे हाही धंदा जोरात चालत असे, सोने आणि चांदी यांच्या विपुल खाणी येथे होत्या, असे ह्युएनत्संगाने सांगितले आहे. डॉ आळतेकरांच्या मते महाराष्ट्रात तांब्याच्या खाणीही होत्या. वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये या धातूवर रासायनिक प्रक्रिया कशा कराव्या ते दिले आहे. पितळही येथे विपुल प्रमाणात तयार केले जात असे; आणि तांब्याच्या पितळेच्या मूर्तीही केल्या जात असत. गुप्त काळात दिल्लीला उभारलेला एक स्तंभ अजूनही दाखविला जातो. तो तेवीस फूट उंच असून त्याचा परीघ सोळा फूट आहे. इतकी शतके झाली तरी त्याला गंज चढलेला नाही. यावरून धातुविद्या, रसायनविद्या या किती प्रगत झाल्या होत्या ते दिसून येते.

रत्ने
 रत्नांसाठी तर भारत त्या काळी फारच प्रसिद्ध होता. वात्स्यायनाच्या कामसूत्रात रूपरत्नपरीक्षा हे स्वतंत्र प्रकरणच आहे. वराहमिहिराने बावीस प्रकारच्या रत्नांची माहिती बृहत्संहितेत दिली आहे. विविध प्रकारच्या रत्नांचे भेद कवींना चांगले