पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१३
आर्थिक जीवन
 

हुलगे, वाटाणे. गळिताची धान्ये:- तीळ, मोहरी, ऊस ही होत. उसाच्या रसापासून गूळ आणि साखरही करीत. आंबा, फणस, कलिंगड, केळी, नारळ, संत्री, मोसंबी या फळांच्या बागा लावण्यास शेतकऱ्यांना उत्तेजन द्यावे, असे सांगितलेले आढळते. ओसाड किंवा पडीत जमीन लागवडीस आणणाराला राजाकडून पारितोषिक मिळे. आणि पिकांचा किंवा वृक्षांचा कोणत्याही प्रकारे नाश करणाराला जबर दंड करावा, असे स्मृतीत सांगितले आहे.

कृषिशास्त्र
 पुढच्या काळातल्या शेतीविषयी माहिती देणारे प्रमुख ग्रंथ म्हणजे अभिधानरत्नमाला आणि माघतिथीचा स्मृतीवरील टीकाग्रंथ. एकंदर अठरा प्रकारच्या धान्यांचा उल्लेख अभिधानरत्नमालेत आहे. शिवाय कडधान्ये व गळिताची धान्ये ती निराळीच. जमिनीची काळजीपूर्वक वर्गवारी करून कोणती जमीन कोणत्या पिकाला योग्य तेही या ग्रंथात सांगितले आहे. मेधातिथीवरून असे दिसते की बी-बियाण्यांचा वैश्यांनी (शेतकऱ्यांनी) उत्तम अभ्यास करावा अशी अपेक्षा होती. कोणते बी दाट पेरावे, कोणते विरळ पेरावे, कोणत्या जमिनीत कोणते बियाणे टाकावे याचा तपशीलही त्यांना माहीत असावा असे दिसते. भात, मोहरी, ऊस यांचे अनेक प्रकार त्या वेळी माहीत होते आणि प्रत्येक प्रकारची निगा कशी राखावयाची याचेही ज्ञान होते. शेतीला पाणी रहाटगाडग्याने किंवा पखालीने देत असत. नवव्या दहाव्या शतकातील अरब प्रवाशांनी पश्चिम हिंदुस्थानातील शेतीची प्रशंसा केलेली आढळते. येथली जमीन सुपीक असून विविध प्रकारची धान्ये, फळे, भाजीपाला येथले शेतकरी पिकवतात असे त्यांनी म्हटले आहे. अरबांचा महाराष्ट्राशी दृढ संबंध होता म्हणून त्यांच्या लिहिण्याला जरा विशेष महत्त्व.
 यादवकाळ अखेरपर्यंत महाराष्ट्रातील शेतीची सामान्यतः हीच स्थिती होती. पिके तीच, कसणीची पद्धत तीच आणि पाण्याची व्यवस्थाही तीच. बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. त्याच्या जोडीला विहिरी व तलाव. पण पाट- बंधारे व कालवे याविषयी मात्र प्रमाणे मिळत नाहीत. शेतीला व एकंदर जीवनाला पाण्याचे महत्त्व किती हे धर्मशास्त्रज्ञांनी व लोकांनी जाणले होते विहीर, तलाव खणणे हे महापुण्य मानले जाई. त्यांचा नाश हे महापाप व मोठा गुन्हा. त्याला जबर शिक्षा असे. असे असूनही महाराष्ट्रात पाटबंधारे, कालवे यांकडे लक्ष दिलेले दिसत नाही. दक्षिणेतील भास्करभवदुरे येथील शिलालेखात पोरूमामिल्ल तलावाची माहिती आहे. त्यावरून जलशास्त्राचा अभ्यास तेव्हा होत असे असे दिसते. गोरिबिदनूरच्या एका लेखात नदी अडवून कालवा काढल्याचा उल्लेख आहे. त्यावरून महाराष्ट्रातही कालवे, पाटबंधारे असावे असे कोणी म्हणतात. पण त्याविषयी कोठल्याही लेखात निर्देश सापडत नाही.