पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२१२
 

प्रवाशांचे आधार घेतलेले आहेतच. पण त्याशिवाय त्या त्या काळच्या स्मृती, पुराणे, बाणभट्टांसारख्यांचे ग्रंथ, वराहमिहिरासारख्या शास्त्रज्ञांचे बृहत्संहितेसारखे ग्रंथ, अमरकोश, निरनिराळ्या ठिकाणचे शिलालेख यांच्या आधाराने माहिती दिली आहे. ही सर्व माहिती पुष्कळशी उत्तर हिंदुस्थानातील आर्थिक जीवनासंबंधीची आहे. कारण वरील बहुतेक ग्रंथ तेथे झालेले आहेत. पण त्या ग्रंथांचा प्रभाव सर्व भारतावर होता. त्यांचे अध्ययन, पठन सर्व भारतात होत होते. तेव्हा त्यांतील वर्णने सामान्यतः महाराष्ट्रालाही लागू पडतील, असे धरून चालण्यास हरकत नाही. धार्मिक ग्रंथ ज्याप्रमाणे सर्व भारताचे एकच, ते उत्तर भारतात झाले तरी दक्षिणेला धार्मिक स्थिती जाणण्यास त्यांचा आधार घेण्यास हरकत नाही, तसेच इतर ग्रंथांचे आहे.
 वाकाटक ते यादव या कालखंडातील आर्थिक जीवनाचे पुढे जे वर्णन केले आहे. ते अशा आधारप्रमाणांच्या साह्याने केले आहे. अनेक पंडितांनी असेही म्हणून ठेवले आहे की शेती, उद्योग आणि व्यापार यांच्या घडणीत इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत फारसा फरक पडला नव्हता. आणि नंतरही व्यापाराचे रूप बदलले तरी शेती व कारागिरी यांच्या स्वरूपात फारसा फरक पडला नाही. म्हणून वरील पद्धतीने पंडितांनी महाराष्ट्रीय आर्थिक जीवनाचे जे वर्णन केले आहे ते बरेचसे विश्वसनीय आहे असे धरून चालण्यास हरकत नाही.
 सातवाहन साम्राज्याच्या विलयानंतर चौथ्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य स्थापन झाले. आणि त्याच वेळी उत्तरेत गुप्तांचे साम्राज्य स्थापन झाले. गुप्त साम्राज्य अत्यंत बलाढ्य असून अखिल भारतव्यापी होते. त्यामुळे सुमारे दोनशे वर्ष, म्हणजे इ. स. ५०० पर्यंत भारताला शांतता प्राप्त झाली. शेती, उद्योग व व्यापार यांची या काळात चांगली प्रगती झाली.

वृक्ष आयुर्वेद
 वराहमिहिराचा बृहत्संहिता हा ग्रंथ सहाव्या शतकातला आहे. त्यात पाऊस मोजण्याची पद्धत सांगितलेली आहे. द्रोण हे त्या वेळच्या मापाचे नाव होते. ग्रह- ज्योतिशास्त्राच्या आधारे पावसाविषयी भविष्येही त्या वेळी वर्तवीत असत. शेतीच्या बाबतीत काही प्रगतीही झालेली असावी असे दिसते. वृक्षआयुर्वेद असे कृषिशास्त्राला म्हणत. या शास्त्राचा कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात उल्लेख केला आहे. वराह- मिहिराने आपल्या ग्रंथात जमीन तयार करणे, पेरणी करणे, वृक्षांची कलमे करणे व पिकांना योग्य वेळी पाणी देणे यासंबंधी नियम दिले आहेत. पिकांवर पडणारे रोग व त्यांवरील उपाय यांचीही चर्चा त्याने केली आहे.

पिके
 या काळातली मुख्य पिके म्हणजे तांदूळ, गहू. कडधान्ये:- मूग, मसूर, उडीद,