पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२११
आर्थिक जीवन
 


दिशाकाक
 प्राचीन काळी नौकानयन करणाऱ्या प्रवाशांना दिशांचे ज्ञान होण्याचे साधन म्हणजे दिशाकाक. हे कावळे शिकवून तयार केलेले असत. जमीन दिसेनाशी झाली की या कावळ्यांच्या गतीच्या अनुरोधाने जहाजे नेत असत. समुद्रप्रवासासाठी खगोल- शास्त्राचे ज्ञानही अवश्य आहे, असे एका जातकाच्या लेखकाने सांगून ठेवलेले आहे.

श्रेणी
 हे व्यापारी आणि इतर व्यावसायिक यांच्या त्या काळी श्रेणी म्हणजे संघटना किंवा मंडळ्या असत. कुंभार, लोहार, तेली, चर्मकार, गंधिक, सुवर्णकार, सार्थवाह, सेटी अशा अनेक श्रेणींचे उल्लेख सातवाहनकालीन शिलालेखांत आढळतात. अलीकडच्या सहकारी पतपेढ्यांसारखे यांचे स्वरूप असावे. या श्रेणी लोकांच्या ठेवीही ठेवीत आणि त्यांना नऊ ते बारा टक्क्यांपर्यंत व्याजही देत. लेण्यांतील शिलालेखात व्यावसायिक श्रेणींचे निर्देश आढळतात. गोवर्धन येथे विणकर संघ होता. नाशिक येथे कुंभार व तेली यांचे संघ होते. नागरी श्रेणीच्या अध्यक्षाला श्रेष्ठी म्हणत. ग्रामीण श्रेणींच्या मुख्याला भोजक म्हणत. या सर्व श्रेणींचे परस्पर सहकार्य असे. कारागीर संघ माल निर्माण करीत आणि व्यापारी संघ त्याची खरेदीविक्री करीत. यावरून आमची प्राचीन ग्रामीण अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती असा जो एक समज आहे तो खरा नाही हे स्पष्ट दिसते. नागर व ग्रामीण जीवन या दोन्ही ठिकाणी स्पर्धा व सहकार्य होते. यामुळेच सहजीवन शक्य होते.
 सातवाहनकालीन आर्थिक जीवनाचे येथवर वर्णन केले. आता वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव या घराण्यांच्या साम्राज्यांच्या काळचे वर्णन करावयाचे. यासंबंधी मुख्य अडचण अशी आहे की या विशिष्ट घराण्यांच्या काळी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय होती याचे वर्णन करणारे ग्रंथ नाहीत. राष्ट्रकूट घराण्याचा इतिहास डॉ. आळतेकरांनी लिहिला आहे. त्यात आर्थिक जीवनाचे वर्णन करणारे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पण त्यात प्रारंभीच त्यांनी ही अडचण सांगितली आहे. पुरेशी आधारप्रमाणे नाहीत. मग त्यांनी काय केले ? पेरिप्लस हा इ. सनाच्या पहिल्या शतकातील परकी प्रवाशाचा ग्रंथ येथपासून तेराव्या शतकातील मार्कोपोलो या प्रवाशाचा ग्रंथ आणि यांच्या मधल्या काळातील इत्सिंग, ह्युएनत्संग, अलबेरूणी, अल् अद्रिसी या प्रवाशांनी लिहून ठेवलेली वर्णने यांचे आधार घेतले. आणि आधीच्या काळी असे होते, नंतरच्या काळात असे होते, त्यावरून मधल्या राष्ट्रकूटांच्या काळी तसेच असावे असे अनुमान करून त्या आधारे वर्णन केले आहे. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या मुनशींनी भारतीय विद्याभवनातर्फे प्रसिद्ध केलेल्या इतिहासात प्रत्येक खंडात, 'आर्थिक स्थिती' हे प्रकरण असतेच. त्यात वरील