पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२०४
 

काढले आहे. त्यानंतरच्या काळात मात्र हळूहळू बालविवाह रूढ होऊ लागले, असे ते म्हणतात. पराशर, व्यास हे या काळातील स्मृतिकार होत. त्यांनी आठ ते दहा वर्षापर्यंतच मुलींचा विवाह झाला पाहिजे असे शास्त्र सांगितले आहे, आणि तसे न न केल्यास पित्याला भ्रूणहत्येचे पातक लागते असे म्हटले आहे. डॉ. आळतेकरांनी आपल्या 'राष्ट्रकूट' या ग्रंथात बृहद्यम, संवर्त, यम, शंख, इ. स्मृतिकारांच्या वचनांचा निर्देश करून याच मतास दुजोरा दिला आहे. इ. स. ७५३ ते ९७३ हा राष्ट्रकूटांचा काळ होय. वरील स्मृतिकार त्या काळातले होत. त्यांनी कन्येचा ऋतुपूर्वकाली विवाह न करणाऱ्या पित्याला किती भयंकर पातके लागतात त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. अल्बेरुणीच्या ग्रंथावरूनही त्याच्या काळी म्हणजे दहाव्या शतकात बालविवाहाची रूढी दृढमूल झाली असल्याचे दिसते, असे ते म्हणतात. ( डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. ३४२).

विधवा-विवाह वंदी
 एकीकडून बालविवाहाचे शास्त्र सांगून त्याच काळात स्मृतिकारांनी विधवा विवाहास बंदी घातली आणि स्त्रीजीवन निर्माल्यवत करून टाकले. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे, तिच्या जीवनाला स्वतंत्र प्रतिष्ठा आहे, हे या शास्त्रकारांना व तत्कालीन समाजाला मान्यच नाही. मनूने अक्षतयोनी स्त्रीच्या पुनर्विवाहास परवानगी दिली आहे ( ९. १७६ ). अशा विवाहापासून झालेल्या पौनर्भव पुत्रालाही मान्यता दिली आहे. पण अन्यत्र ( ९. ६५) विधवा-विवाहाचा निषेध केला आहे. पुढील काळात तर उत्तरोत्तर स्मृतिकार पुनर्विवाहाचा अती तीव्र निषेध करू लागले. त्यातही पराशर, नारद व लघुसातातप यांनी कुमारी विधवांच्या विवाहास अनुज्ञा दिली आहे. पण अंगिरस व लघु आश्वलायन यांनी वधू केवळ वाग्दत्ता असली, आणि नियोजित वर मृत्यू पावला असला तरीही, तिचा विवाह दुसऱ्याशी करू नये, असा नियम सांगितला आहे. कलिवर्ज्य प्रकरणात व पुढील काळात स्मृतींच्या आधारे धर्मशास्त्र सांगणारे निबंधकार यांनी एकमुखाने स्त्रीचा पुनर्विवाह निषिद्ध मानला आहे. यासंबंधी लिहिताना कुलगुरू वैद्य लिहितात, 'पतिनिधनानंतर वैधव्यदशेत आयुष्य कंठावयाची चाल हिंदुसमाजात फार पुरातन कालापासून चालत आली आहे व या कालात ( इ. स. ८०० - १००० ) त्या चालीत बदल झाला नसावा हे उघड आहे. इतकेच काय, पण या कालातच या चालीचे हिडीस व दैन्यवाणे स्वरूप प्रगट झाले. समाजात बालविवाहाची चाल रूढ झाल्यामुळे बालविधवांची संख्या फार झाली असावी व हल्लीप्रमाणेच बालविधवांची स्थिती तेव्हा अत्यंत कारुणिक झाली असेल' ( मध्ययुगीन भारत, भाग २ रा, पृ. ३३५ ). तेव्हा साधारणतः असे दिसते की धर्मशास्त्राचा प्रारंभापासूनच विधवा-विवाहाविरुद्ध कटाक्ष आहे. पतीच्या मागे स्त्रीने व्रतस्थ राहून, धर्माचरणात निमग्न राहून काल कंठावा असाच सर्वांनी उपदेश केलेला आहे.