पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०३
समाजरचना
 

असत, असे तत्कालीन काव्यनाटकांवरून दिसते. सम्राट हर्ष याची बहीण राज्यश्री ही नृत्यगायनादी कलांत निपुण होती. शकुंतलेची सखी अनसूया हिने चित्रकला अभ्यासली होती. तिला इतिहासज्ञानही होते. मालविका तर नृत्यगायनाचे नियमित पाठ घेत असे. तिची परीक्षा एका तपस्विनीने घेतली, यावरून तप व कला यांत विद्वेष नव्हता, असे दिसते. रत्नावलीतील सागरिका आपल्या प्रियाचे चित्र वाढते. मालतीमाधवातील मालतीही असेच चित्र काढते. प्रियदर्शिकेत नृत्य, गायन, वादन या उच्चकला मानलेल्या असून, तरुण तरुणींनी त्यांचा अभ्यास आवर्जून करावा, असे सांगितले आहे. वात्स्यायनाने आपल्या कामसूत्रात स्त्रियांनी ६४ कलांचा अभ्यास करावा असे आग्रहाने प्रतिपादिले आहे. त्याने आदर्श गृहिणीचे चित्र काढले आहे; त्यात संसारातील सर्व जमाखर्चाचे ज्ञान तिला असावे असे सांगितले आहे. गुप्त कालातील साहित्यावरून असे दिसते की थोर कुळातील स्त्रिया व आश्रमवासी स्त्रिया इतिहास व पुराणे यांचे वाचन करीत असत व काव्यरचनाही करीत असत. गाथासप्तशतीत अनेक स्त्रियांच्या गाथा समाविष्ट केलेल्या आहेत, हे प्रसिद्धच आहे. पुढील काळात स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षणसंस्था होत्या व काही ठिकाणी सहशिक्षणही होते असे दिसते. 'मालतीमाधवा'तील कामंदकी हिचे शिक्षण नायकाच्या वडिलांच्या बरोबर एकाच गुरूच्या आश्रमात झाले. त्या वेळी त्या आश्रमात इतरही अनेक विद्यार्थिनी होत्या. 'उत्तररामचरिता'तील तपस्विनी आत्रेयी हिचे शिक्षण वाल्मीकींच्या आश्रमात लव आणि कुश यांच्या बरोबर झाले होते. आणि त्यानंतर ती दंडकारण्यात अगस्त्यांच्या आश्रमात वेदान्त अध्ययनासाठी आली होती. विद्वानांचा असा तर्क आहे की कवींनी ही चित्रे समकालीन जीवनावरून रंगविली असावीत ( क्लासिकल एज - हिस्टरी ॲड कल्चर ऑफ इंडियन पीपल, सं. डॉ. मुनशी, पृ. ५६३).

बालविवाह
 बालविवाहाविषयी वर निर्देश आलाच आहे. या रुढीमुळे स्त्रीचे विद्याध्ययन खुंटते आणि तिच्या एकंदर मनोविकासाची सर्व संधी नष्ट होते आणि ती केवळ चूल व मूल यांची अधिकारी होऊन बसते. पण ही रूढी प्राचीन काळी नव्हती. गाथासप्तशतीतील काही गाथा देऊन त्या काळी मुलींचे विवाह प्रौढपणी होत असत, असे स. आ. जोगळेकर यांनी दाखविले आहे. त्याच ठिकाणी डॉ. भांडारकर, डॉ. आळतेकर यांच्या ग्रंथाच्या आधारे आश्वलायन, बौधायन, हिरण्यकेशी इ. या धर्मसूत्रांतील वचनांचे निर्देश करून विवाहसमयी मुली प्रौढ असत या मताला शास्त्रग्रंथांची प्रमाणेही त्यांनी दिली आहेत (गाथासप्तशती, पृ. २०२ ). कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांच्या मते हर्षाच्या काळापर्यंत या देशात बालविवाह रूढ नव्हता. बाणाच्या हर्षचरितातील राज्यश्रीच्या विवाहवर्णनाच्या व स्वतः बाणाच्या विवाहाच्या आधारे त्यांनी हे अनुमान