पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०१
समाजरचना
 

१५-१६ असे होते. त्यानंतर धर्मशास्त्रकारांचे मत बदलले आणि मुलींच्या विवाहाचे वय कमी होऊन ऋतूत्तर विवाह हे पाप मानले जाऊ लागले; आणि ८ व्या ९ व्या शतकापर्यंत नऊ, दहा वय मुलींच्या विवाहाला योग्य मानले जाऊ लागले. ब्रह्मपुराणात तर चौथ्या वर्षी मुलीचे लग्न करावे असा उपदेश केला आहे. अर्थात बालविवाहाच्या रूढीबरोबर मुलींचे शिक्षणही संपुष्टात आले; आणि मग समाजातली त्यांची प्रतिष्ठाही कमी होऊ लागली (पोझिशन ऑफ विमेन इन् हिंदू सिव्हिलिझेशन, डॉ. आळतेकर, पृ. १ ते २५ ).

स्त्री-निंदा
 आपल्या कालखंडाच्या प्रारंभीच्या पाच-सहाशे वर्षीच्या काळातील प्रमुख शास्त्र- ग्रंथ म्हणजे महाभारत, मनुस्मृती व याज्ञवल्क्य स्मृती हे होत. या ग्रंथांनी स्त्रियांना वेदाध्ययन सर्वस्वी वर्ज्य मानले आहे. विवाहाशिवाय त्यांचा कोणताही संस्कार वेदमंत्रांनी करावयाचा नाही, असा त्यांचा दंडक आहे. विवाहानंतर पतिसेवा हाच त्यांचा यज्ञ व हेच त्यांचे वेदाध्ययन, असे या ग्रंथांचे मत आहे. स्त्रीला कसल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही, बालपणी पिता, तरुणपणी भर्ता व वृद्धापकाळी पुत्र हे त्यांचे रक्षणकर्ते होत. धार्मिक व्रतवैकल्याचेही स्वातंत्र्य त्यांना पुराणांनी दिलेले नाही. पतीच्या अनुज्ञेवाचून ती आचरली तर त्यांचे फळ मिळत नाही, असे पुराणे म्हणतात. दासाप्रमाणेच स्त्रियांना धनाचाही हक्क नाही. त्यांचे जे स्वामी त्यांची मालकी त्यांच्या धनावर असावयाची. 'स्त्रीणां अष्टगुणः कामः ।' असे कौटिल्य म्हणतो. तर स्त्रिया पुरुषांचे रूप पाहात नाहीत, वय पाहात नाहीत. तो केवळ पुरुष आहे, एवढेच त्यांना पुरते, असे मनूने म्हटले आहे ( ९.१४ ). स्त्रिया फार चंचल स्वभावाच्या असतात. सत्वर मोहवश होतात. त्यामुळे कितीही सावधगिरी ठेविली तरी त्या पतीशी प्रतारणा करतातच, असेही तो म्हणतो ( ९.१५ ).

स्त्री कर्तृत्व
 ही शास्त्रवचने दिली ती त्या काळी कलौघ कसा बदलला होता हे दाखविण्यासाठी. वैश्यशूद्र यांच्याविषयी त्या काळात कडक दण्डक असूनही प्रत्यक्षात त्याची कडक अंमलबजावणी होतच असे असे नाही, हे वर सांगितलेच आहे. स्त्रियांच्या बाबतीत असेच होते. या काळी स्त्री जीवनाच्या विकासाला बाधक असे जरी शास्त्रनियम रचले गेले तरी, पुढे दीर्घकाळपर्यंत स्त्रीला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात व्यक्ति- विकासास अवसर मिळत गेला व त्यामुळे स्त्रिया कर्तबगार होऊ शकल्या. इ. सनाच्या अकराव्या बाराव्या शतकात मात्र स्त्रीची सर्व बाजूंनी कोंडी झाली व तिचे जिणे कष्टाचे व विद्याविहीन होऊ लागले.
 आपल्या कालखंडातील महाराष्ट्र- स्त्रियांच्या कर्तृत्वाची काही उदाहरणे प्रथम पाहू.