पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२००
 

द्रौपदीला धर्मराजाने पणाला लाविले ते त्याच काळात भर सभेत तिला विवस्त्र करण्याचा कौरवांनी विचार केला तो त्याच काळात आणि अशा वेळी तात्विक कारण सांगून भीष्मद्रोण मूग गिळून बसले ते त्याच काळात. हरिचंद्राने तारामतीला कर्जफेडीसाठी विकून टाकली ही कथा पुराणकाळाचीच आहे. या कथा स्त्रीजीवनाला काही मोल असल्याच्या द्योतक नव्हेत. पण त्या काळचा एकंदर इतिहास पाहता उत्तर काळातल्यापेक्षा त्या प्राचीन काळचे स्त्रीजीवनाचे चित्र पुष्कळच जास्त उदात्त व विलोभनीय होते यात शंका नाही.

स्त्री-वेदाधिकार ?
 एकूण एक सर्व स्मृतिकारांच्या मते स्त्रीला वेदाधिकार नाही. तिने वेदपठन करावयाचे नाही, वेदमंत्र म्हणावयाचे नाहीत, तिचे संस्कारही वेदमंत्रांनी करावयाचे नाहीत, असा दण्डक सर्व स्मृतिकारांनी घातलेला आहे. पण वेदसंहिता पाहिली तर असे दिसते की प्रत्यक्ष वेदमंत्रांची रचना स्त्रियांनी केलेली आहे. अपाला, विश्ववारा, घोषा, लोपामुद्रा, सिकता, निवावरी अशी जवळ जवळ वीस स्त्रियांची नावे ऋग्वेदातील सूक्तांच्या कर्त्या ऋषींच्या नावांच्या यादीत आढळतात. हिंदुधर्माचा वेद हा मूलाधार मानला जातो. त्या वेदाची रचना करण्याचा अधिकार पुरुषाइतकाच स्त्रियांना आहे, हे प्राचीनांना निश्चित मान्य असले पाहिजे. त्यांच्या मताने स्त्रियांना वेदाधिकार आहे की नाही हा प्रश्न बालिश व हास्यास्पदच ठरला असता. वेदमंत्राइतकाच ब्रह्मविद्येचाही स्त्रियांना अधिकार होता. मैत्रेयी, गार्गी, वाचक्नवी, वडवा, या ब्रह्मवादिनी स्त्रिया उपनिषदात प्रसिद्ध आहेत. मीमांसा, व्याकरण या शास्त्रांचे अध्ययन व अध्यापनही स्त्रिया प्राचीन काळी करीत होत्या. आचार्या, उपाध्याया ही अभिधाने व्याकरणकारांनी त्यांच्यासाठी निराळी योजिलेली आहेत. आचार्यानी म्हणजे आचार्यांची पत्नी. पण आचार्या म्हणजे स्वतः अध्यापन करणारी पंडिता. प्राचीन समाजधुरीणांचे स्त्रीच्या बुद्धीविषयी, तपश्चर्येविषयी हीन मत नसल्यामुळे त्यांनी तिला ज्ञानाच्या क्षेत्रातले सर्व अधिकार देऊन टाकले होते. मुलांप्रमाणे मुलींचे त्या काळी उपनयन होत असे. त्यांनाही वेदविद्या शिकविली जात असे. आणि त्या संध्याही करीत असत. सीता संध्या करीत असल्याचा उल्लेख रामायणात आहे. स्त्रीला उत्तम शिक्षण मिळाले तरच ती उत्तम संसार करू शकेल, असे मत अथर्ववेदाने मांडले आहे. काही स्त्रिया त्या काळी अविवाहित राहून आजन्म विद्येची उपासना करीत व अध्ययन-अध्यापनाला वाहून घेत. स्त्रीचा हा अधिकार त्या काळच्या समाजाने मान्य केला होता.

प्रौढ विवाह
 डॉ. आळतेकरांच्या मते इ. पू. तिसऱ्या शतकापर्यंत मुलींच्या विवाहाचे वय