पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९९
समाजरचना
 

द्विज अपवित्र होतात, त्यांच्या सावलीने विटाळ होतो, असले मूर्ख दंडक मनुयाज्ञवल्क्यांच्या स्वप्नातही नव्हते. १० व्या शतकात होऊन गेलेला मनुस्मृतीचा टीकाकार मेधातिथी यानेही असेच मत मांडले आहे. त्यानंतरच्या काळात सर्वच जातिबंधने कडक होऊ लागली. दूरीकरणाची, भेदाची प्रवृत्ती वाढत चालली आणि त्यानंतर अस्पृश्यता निर्माण झाली ( म. म. काणे, धर्मशास्त्र, खंड २ रा प्रकरण ४ थे ). या बाबतीत काणे यांनी व्याघ्रपाद, बृहस्पती, कुल्लुक, अपरार्क यांचा निर्देश केला आहे. आपल्या टीकांमधून त्यांनी अस्पृश्यतेचे शास्त्र सांगितले आहे. पूर्वपरंपरेला ते मुळीच मान्य नाही.

स्त्री-जीवन
 भिन्न वर्ण व भिन्न जाती यांच्या परस्पर संबंधाइतकाच स्त्रीपुरुष संबंध हाही समाजकारणातील एक महत्त्वाचा विषय आहे. वरील घटकांच्या परस्परसंबंधावर समाजाचा उत्कर्षापकर्ष जसा अवलंबून आहे तसाच किंवा त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तो स्त्रीपुरुषसंबंधावर आहे. म्हणून या कालखंडातील महाराष्ट्रातील स्त्री- जीवनाचा आता अभ्यास करावयाचा आहे.

स्त्री-रत्ने
 भारतातील स्त्रीजीवनाचा इतिहास वरवर पाहिला तरी असे दिसते की या भूमीत स्त्री हा शब्द त्याग, निष्ठा, चारित्र्य, सेवा, कर्तव्यबुद्धी, आत्मार्पण, यांशी समानार्थक झालेला आहे. सीता, सावित्री, दमयंती, द्रौपदी, पद्मिमी, जिजामाता, लक्ष्मीबाई ही नावे उच्चारताच वरील सर्व पवित्र भावना चित्तात उदित होतात आणि मस्तक नम्र होते. पण याच वेळी मनामध्ये दुसरा एक खेदकारक विचार उभा राहतो व मन उद्विग्न होऊन जाते. ज्या भारतभूमीत ही स्त्रीरत्ने जन्माला आली आणि ज्या हिंदुसमाजाला त्यांनी आपल्या असामान्य पावित्र्याने मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्याच भूमीतल्या त्याच हिंदुसमाजाने भारतीय स्त्रीची जेवढी अप्रतिष्ठा करता येईल तितकी केली आहे. स्त्री ही चंचल आहे, ती नित्य विकाराधीन असते, स्वातंत्र्याला ती नालायक आहे, तिला बंधनातच ठेविली पाहिजे, ती मोक्षमार्गातील धोंड आहे, शहाण्याने स्त्रीच्या नादाला लागू नये, तिला विद्येचा, वेदमंत्राचा, धनाचा कसलाही हक्क नाही असे तिच्याविषयीचे अनेक उद्गार हिंदूंच्या धर्मशास्त्रात व इतर वाङ्मयात आढळतात. ज्या लोकांची अशी विचारसरणी आहे त्यांच्या समाजात स्त्रीला किती प्रतिष्ठा लाभेल हे कळतेच आहे.
 त्यातल्या त्यात मनाला दिलासा देणारी एक गोष्ट आहे, ती ही की प्राचीन काळी स्त्रीकडे बघण्याची इतकी अनुदार व हीन दृष्टी नव्हती. ही विचारसरणी उद्भवलीच नव्हती असे नाही. श्रीरामचंद्रांना सीतेचा त्याग करणे भाग पडले ते त्याच काळात.