पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१९०
 


समता
 या भूमिकेतून प्राचीन काळच्या व्यवसाय बंधनांचा विचार करता असे दिसते की शास्त्रात अशी बंधने सांगितलेली असली तरी प्रत्यक्षात ती असून नसल्यासारखीच होती. वेदातील अनेक सूक्ते क्षत्रियांनी रचलेली आहेत. गायत्रीमंत्राचा द्रष्टा विश्रामित्र हा क्षत्रिय होता. चंद्रवंशीय राजा पुरुरवा हाही अनेक मंत्रांचा द्रष्टा होता. शंतनूचा भाऊ देवापी हा तर मंत्रकर्ता असून पौरोहित्यही करीत असे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ९४ वे सूक्त नागवंशीय कद्रूचा पुत्र अर्वुद याने रचले आहे. त्याच मंडलातील १०९ व्या सूक्ताची कर्ती सर्पराज्ञी ऋषी ही होती. ७६व्या सूक्ताचा कर्ता नागजातीय इरावतपुत्र जरत्कर्ण हा होता. प्रत्यक्ष वेदमंत्रांची रचनाच जेथे क्षत्रियांनी व नागांनी केलेली होती, तेथे याजन, अध्यापन, प्रतिग्रह यांचा अधिकार त्यांना नाही, तो फक्त ब्राह्मणांनाच आहे, या वचनाला कितपत अर्थ असेल हे दिसतच आहे.
 क्षत्रिय जसे वेदमंत्रांचे द्रष्टे होते तसेच ते औपनिषदिक ब्रह्मविद्येचे ज्ञाते व उपदेष्टेही होते. गार्ग्यनामक ब्राह्मणास काशीचा राजा अजातशत्रू याने ब्रह्मविद्या शिकविली, जीवलपुत्र प्रवहण या राजाने गौतमनामक ब्राह्मणाला ब्रह्मज्ञान दिले, केकयपुत्र अश्वपतिराजाचे पाच ब्राह्मण शिष्य होते. तेव्हा वेदमंत्रांचे दर्शन व ब्रह्माचे ज्ञान फक्त ब्राह्मणांनाच होत असे असे नाही. क्षत्रियही त्या क्षेत्रात तितकेच श्रेष्ठ होते. ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्याचा अधिकार त्या काळी शूद्रांना सुद्धा होता. यजुर्वेदातील 'ही कल्याणकारी वाणी मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चारण या सर्वासाठी उच्चारली' या मंत्रावरून हे स्पष्ट होते. 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या सर्वांमध्ये तू तेज निहित कर' या तैत्तिरीय संहितेतील मंत्रावरून हेच दिसते. ( पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, स्पर्शास्पर्श, पृ. ४४,४६ ) हे उतारे देऊन पंडित सातवळेकर म्हणतात, 'ही समानता पाहण्यासारखी व विचार करण्यासारखी आहे.'

शूद्रप्रतिष्ठा
 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे भेद त्या काळी निर्माण झाले असले तरी शूद्रांना तेव्हा आजच्यापेक्षा शतपटीने जास्त प्रतिष्ठा होती, हे त्या काळच्या वाङ्मयावरून सहज दिसून येते. 'नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो' इ. यजुर्वेदातील (अ. १६।२७ ) मंत्र देऊन पंडित सातवळेकर म्हणतात: सुतार, लोहार, रथकार, कुंभार, निषाद, भिल्ल हे सर्व कारागीर शूद्र. यांना नमन करावे, असे वेदांमध्ये सांगितले आहे. हे मंत्र द्विजांच्या तोंडचे आहेत. त्या दृष्टीने त्यांची महती विशेष आहे. काळाच्या ओघात विचारांना चालना न मिळाल्यामुळे या नमस्कारार्ह जाती पुढे हीन व वहिष्कृत गणल्या गेल्या. क्षुद्र विषमता शेवटी कोणत्या थरास जाऊन पोचते व ती समाजाला कशी बाधक होते हे पहावयाचे असल्यास हिंदुसमाजातील ही स्पर्शास्पर्शाची