पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९१
समाजरचना
 

चाल पहावी. (स्पर्शास्पर्श, पृ. १०७, १०८ ) राजाचे मंत्री किती असाचे व ते कोणत्या वर्णाचे असावे, याविषयी महाभारतात पितामह भीष्मांनी पुढीलप्रमाणे अभिप्राय दिला आहे. 'राजाने चार ब्राह्मण मंत्री, आठ क्षत्रिय मंत्री, एकवीस वैश्य मंत्री, तीन शूद्र मंत्री व एक सूत मंत्री असे मंत्री नेमावे.' (शांति, ८५, ८ ). सूत हा प्रतिलोम विवाहजन्य अर्थात शूद्र होता. हे ध्यानात घेता ब्राह्मणांइतके शूद्र मंत्री होते असे दिसेल. 'तीन वर्णांची सेवा हाच शूद्राचा धर्म होय' असे त्या वेळी शास्त्र होते. महाभारतातच तसे अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. शूद्र मंत्रिपदापर्यंत गेल्यानंतर या शास्त्राचा मुलाहिजा कितपत राखला जात असेल याची कल्पना सहज येईल, आणि शूद्राला त्या काळी राजपदही दुष्प्राप्य नव्हते हे पाहिल्यावर तर याविषयी शंकाच राहणार नाही. 'शूद्र राजा होऊ शकेल की नाही' या युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म म्हणतात, 'राजा, अपार व नौकाशून्य अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत नौकाच झालेला असतो तो जरी शूद्र असला तरी त्याचा तो सन्मान करणें सर्वथैव योग्यच आहे.' ( शांति ७८- ३८ ) वर्णनिश्चय गुणकर्मांवरून करावा व ज्याच्या अंगी पात्रता दिसेल त्याला उत्कर्षाची जन्मनिरपेक्ष वाटेल ती संधी द्यावी याविषयी प्राचीनांचा किती कटाक्ष होता हे यावरून स्पष्ट होईल.

उदार दृष्टी
 वर्णभेद व जातिभेद याविषयीची ही उदारदृष्टी केवळ शास्त्रग्रंथांतच होती असे नाही. इतिहासही तिला पुष्टी देतो. मौर्य व सातवाहन हे पुराणांच्या मते शूद्र होते, तरी ते साम्राज्यपदी आरूढ होऊ शकले आणि शतकेच्या शतके त्यांनी राज्ये केली. आज, ते क्षत्रिय होते, असे काही पंडित म्हणतात. पण त्या काळच्या रूढ मताप्रमाणे ते शूद्र होते, तरीही शास्त्राने व लोकांनी त्यांच्या राजपदाला मान्यता दिली होती. ह्युएनत्संगाने लिहून ठेविले आहे की त्याच्या काळी दोन राजे वैश्य होते व दोन राजे शूद्र होते. कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी म्हटले आहे की इ. पू. ३०० पासून इ. स. ६०० पर्यंत येथील राजपदावर बरीच वैश्य व शूद्र घराणी, त्याचप्रमाणे बरीच परदेशी घराणी आल्यामुळे सूर्य व चंद्र वंशांची मातब्बरी नाहीशी होऊन ताम्रलेखात राजांच्या वंशांचा निर्देश करण्याची आवश्यकता राहिली नसावी असे दिसते. (मध्ययुगीन भारत, भाग १ ला, पृ. ९३ )

आक्रमक विलीन
 इ. पू. चौथ्या शतकापासून पुढील एक हजार वर्षांत यवन, शक, कुशाण, हूण यांची भारतावर अनेक आक्रमणे झाली. या जमातींना मनूने शूद्र ठरविले आहे. त्याच्या मते ते मूळचे क्षत्रिय, पण संस्कारलोपामुळे ते शूद्र झाले. पण तरीही त्यांनी येथे राज्ये, साम्राज्ये स्थापन केली व ती अनेक शतके चालविली. त्यांचे शूद्रत्व याच्या