पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१८८
 

जयसिंह ३ रा याची कन्या, याची बहीण अक्कादेवी ही कदंब घराण्यात दिली होती. कल्याणी चालुक्य विक्रमादित्य ६ वा याची एक राणी जक्कलदेवी ही कदंब कुलातील होती. त्याची दुसरी एक राणी उच्च कुळातली नसून एका गावकामगाराची कन्या होती. विक्रमादित्याने आपली एक कन्या कदंब (ब्राह्मण) कुळातील जयकेशी याला दिली होती. पल्लव, चोल, गंग यांच्या घराण्यांशीही चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांच्या नित्य सोयरिकी होत असत. राजघराण्यातच असे मिश्र विवाह होत असे नाही. सुप्रसिद्ध कवी बाण याची सावत्र आई शूद्र होती. प्रख्यात संस्कृत प्राकृत कवी राजशेखर (ब्राह्मण) याची स्त्री अवन्तीसुंदरी ही चव्हाण कुळातील क्षत्रिय कन्या होती. [ ( १ ) डॉ. रा. गो. भांडारकर, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन. (२) म. म. काणे, धर्मशास्त्र, खंड २ रा, भाग १ ला, पृ. ४४७-५१. (३) म.म. काणे यांचा लेख 'भारतवर्षातील मिश्रविवाह'- बाँबे लॉ, रिपोर्टर, १९३६ ऑगस्ट १५ (४) कुलगुरु चिंतामणराव वैद्य, मध्ययुगीन भारत, भाग १ ला ] अशा रीतीने आंतरवर्णीय विवाह इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकापर्यंत चालू होते. नंतरच्या काळात ते बंद झाले असे काणे व वैद्य या दोघाही पंडितांनी मत दिले आहे. डॉ. कन्हय्यालाल मुनशी व डॉ. यू. एन. घोपल यांनी इ.स. ३२० ते ७८० (क्लासिकल एज ) या कालखंडात अनुलोम विवाह ही नित्याचीच गोष्ट होती व प्रतिलोमही दुर्मिळ होते असे नाही, असे आपले मत दिले आहे (दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल, खंड ३ रा, प्रस्तावना व सोशल कंडिशन्स हे प्रकरण ).

व्यवसायसंकर
 प्राचीन काळी याप्रमाणे अनुलोम आणि प्रतिलोमही वर्णसंकर शास्त्रमान्य व जनमान्य होता, तर व्यवसायसंकर यापेक्षाही जास्त रूढ असला पाहिजे, हे उघडच आहे. चातुर्वर्ण्य संस्थेचे वैशिष्टय म्हणजे ही दोन बंधने. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनी एकमेकांत विवाह करू नये आणि एकमेकांचे व्यवसाय करू नये. पण पुराण काळात या वर्णाचा व आंतरप्रभव जातींचा उल्लेख येत असला व त्या वर्णांचे व जातींचे व्यवसायही शास्त्रकारांनी ठरवून दिले असले तरी, त्या काळी वर्णभेद व जातिभेद कोणत्याच अर्थाने उत्तर काळातल्याप्रमाणे कडक नव्हते. त्या काळी वर्णभेद नव्हते, वर्गभेद होते, असे काही पंडित म्हणतात त्यात हाच अर्थ अभिप्रेत आहे. अनुलोम विवाह तर त्या काळी धर्मशास्त्रानेच मान्य केले होते आणि वर्णाना व जातींना आपापले व्यवसाय त्यांनी नेमून दिले असले तरी त्यातही पुष्कळच लवचिकपणा होता. त्यामुळे समाजातील बहुतेक थरांतील लोकांना उत्कर्षाला संधी मिळून समाजात बन्याच अंशाने समता प्रस्थापित होत असे.