पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८७
समाजरचना
 

या प्रतिलोम विवाहातून जन्मला होता. महाराष्ट्रातील वाकाटक राजे हे ब्राह्मण होते. त्या घराण्यातील नृपती रुद्रसेन २ रा याची राणी प्रभावती गुप्ता ही वरील गुप्त सम्राट घराण्यातील चंद्रगुप्त २ रा याची कुबेरनागा या नाग स्त्रीपासून झालेली राजकन्या होय. वाकाटक नृपती देवसेन याचा मंत्री हस्तिभोज याच्या एका ब्राह्मण पूर्वजाने ब्राह्मण व क्षत्रिय अशा दोन स्त्रिया केल्या होत्या. कदंब राजे ब्राह्मण होते. त्यांचा एक राजा ककुस्थवर्मा याने आपल्या कन्या गुप्तांच्या वैश्य घराण्यांत व इतर क्षत्रिय घराण्यांत दिल्या होत्या. हे सर्व प्रतिलोम विवाह होत. शास्त्राअन्वये यांची संतती शूद्र ठरावयास हवी. पण तसे कधी कोणी मानले नाही. सातवाहन सम्राटांचा अश्वमेध व इतर यज्ञ करण्याचा अधिकार ज्याप्रमाणे वेदवेत्या ब्राह्मणांनी मान्य केला होता, त्याचप्रमाणे गुप्त, वाकाटक, भगनाग यांचाही मान्य केला होता. वाकाटक ब्राह्मण असून त्यांनी वैश्य, क्षत्रिय व नाग कुळांतील स्त्रिया केल्या होत्या, तरी त्यांच्या वंशाच्या ब्राह्मण्याला बाघ आला नाही.

प्रतिलोम-प्रतिष्ठा
 या कालखंडात महाराष्ट्रात व त्याच्या आसपास जी राजघराणी झाली त्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, नाग, शूद्र अशी भिन्न वर्णाची व वंशांची घराणी होती. त्यांतल्या अनेक राजांनी शक, नाग, हूण यांच्या कन्यांशी विवाह केले होते. तरीही या सर्व घराण्यांत परस्परांत विवाहसंबंध सर्रास होत असत. पण त्यामुळे त्यांच्या राजपदाला, कर्तृत्वाला किंवा कुलप्रतिष्ठेला कधी कमीपणा आला नाही. सातवाहनांच्या काळी वनवासी या प्रदेशावर राज्य करणारे चुटू हे घराणे मानव्यगोत्री ब्राह्मणाचे होते. चुटू हे सातवाहनांचे मांडलिक असून त्यांचे नातेवाईकही होते. वाकाटक नृपती नरेंद्रसेन ( ब्राह्मण ) याची राणी अज्झितभट्टारिका ही राष्ट्रकूट (क्षत्रिय ) घराण्यातील होती. चालुक्य, राष्ट्रकूट व कलचूरी यांच्यांत वारंवार सोयरिकी होत असत. बदामी चालुक्य विक्रमादित्य २ रा याच्या दोन राण्या लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी या कलचूरी घराण्यातील होत्या. विक्रमादित्य ४ था याची राणी बाेधादेवी ही कलचूरी होती. कलचूरी घराण्यातील कर्णदेव याची राणी अव्वलदेवी ही हूण राजकन्या होती. कल्याणी चालुक्य विक्रमादित्य याची राणी कदंब (ब्राहाण ) कुळातील जयकेशी (इ. स. १०५०-१०८० ) याची कन्या होती. कदंबकुलातील जयकेशी २ रा ( ११०४-११४०) याची कन्या चालुक्य नृपती विक्रमादित्य २ रा याला दिली होती. हे दोन्ही प्रतिलोम विवाह होत. पण त्यांची संतती कधी शूद्र ठरली नाही. राष्ट्रकूट नृपती इन्द्रनित्यवर्ष (इ. स. ९१४ ) याची राणी विजंबा, त्याचप्रमाणे कृष्ण ३ रा याची आई व राणी या सर्व कलचुरी घराण्यातील होत्या. राष्ट्रकूट राजा कर्क याने आपली कन्या कल्याणी चालुक्य तैल अथवा तैलप याला दिली होती. राष्ट्रकूटांचा संस्थापक दंतिदुर्ग याची आई बदामी चालुक्य घराण्यातील होती. कल्याणी चालुक्य