पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१८६
 

अंतरात त्यांना विलीन करून टाकले. या आक्रमणांच्या काळी भारतात चातुर्वण्य, जातिभेद यांचे नियम उत्तर काळातल्याप्रमाणे कडक असते, उदार धोरणाचा येथे अभाव असता तर या सर्व आक्रमक जमाती जिंकल्या गेल्यावर अस्पृश्य ठरल्या असत्या व त्यांचे भिन्न गट, भिन्न पुंज आजही भारतवर्षात ठायी ठायी दिसले असते. पण आज त्या नावापुरत्याही उरल्या नाहीत. समाजात एकरूपता. समता निश्चयाने प्रस्थापित करण्याचे प्राचीन ऋषिमुनींचे तत्त्व त्याचेच हे फळ आहे.

मिश्र विवाह
 महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहता, प्रारंभीच्या हजार बाराशे वर्षांच्या काळात तरी असे स्पष्ट दिसते की हा समाज वर्णजातींनी बद्ध असला तरी, त्या वर्णजातिव्यवस्थेला कडक रूप मुळीच आलेले नव्हते. त्यांच्यात मिश्र विवाह बऱ्याच प्रमाणात होत असत. प्रारंभीच्या सातवाहनांच्या कुलाचा वृत्तांत पाहा. पुराणकथेप्रमाणे ब्राह्मणकन्या व नागपुरुष यांच्यापासून या कुलाच्या संस्थापकाचा जन्म झाला. हा प्रतिलोम विवाह. अर्थातच तज्जन्य संतती ही शूद्र होय. पण या शूद्रवंशाने महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य केले. सातवाहन क्षत्रिय होते की ब्राह्मण असा आज वाद आहे. पण पुराणांनी त्यांना शूद्र ठरविले आहे, त्या अर्थी त्या काळी त्यांना शूद्र मानीत असतील, असे वाटते. पण असे असूनही या वंशातील बहुतेक थोर सम्राटांनी अश्वमेध केलेले आहेत. तेव्हा ज्या ब्राह्मणांनी त्यांच्या यज्ञात पौरोहित्य केले त्यांना, सातवाहन हे शास्त्राअन्वये शूद्र असले तरी, गुणकर्मामुळे ते क्षत्रिय ठरतात, हे मान्य असले पाहिजे. सातवाहनांनी केवळ अश्वमेध यज्ञच केले असे नाही, तर पौंडरिक, अग्न्याधेय, दाशरात्र इ. अनेक यज्ञ केल्याचे नाणे घाटातील शिलालेखात सांगितले आहे. सातवाहन स्वतःला चातुर्वर्ण्याचे संरक्षक म्हणवितात. गौतमीपुत्र शातकर्णी याने वर्णसंकर थांबविला असा, त्याची माता गौतमी बलश्री हिने कोरविलेल्या शिलालेखात, त्याचा गौरव केला आहे. पण सातवाहन कुळात तर वर्णसंकर प्रारंभापासून चालू होता असे इतिहास सांगतो. या कुळाच्या संस्थापकाचा उल्लेख वर आलाच आहे. नंतरचा पहिला शातकर्णी याची राणी नागनिका ही नाग कुळातील होती. वर उल्लेखिलेल्या गौतमीपुत्र शातकर्णीचा मुलगा वसिष्ठीपुत्र शातकर्णी याची राणी ही शकराजा रुद्रदामा याची कन्या होती. म्हणजे नाग, शक यांच्याशी संकर झाला तरी चातुर्वर्ण्याला बाध येत नाही, असे या राजांचे मत होते असे दिसते. ( महात्माजी वर्ध्याच्या आश्रमात स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात आग्रहाने विवाह घडवून आणीत. स्वतः वैश्य असून त्यांनी एक ब्राह्मण- कन्या सून म्हणून घरात आणली होती. तरी जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य व जाती, पोटजाती यांवर त्यांची अविचल श्रद्धा होती. ) गुप्त है वैश्य होते. पण त्यांचा पहिला सम्राट चंद्रगुप्त याने लिछवी या क्षत्रिय घराण्यातील राजकन्येशी लग्न केले होते. हा प्रतिलोम विवाह होय. भारताचा नेपोलियन म्हणून ज्याची कीर्ती आहे तो सम्राट समुद्रगुप्त