पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८५
समाजरचना
 

लिंगपुराण इ. प्राचीन ग्रंथांत वारंवार सांगितलेले आढळते. यामुळे गुणांवरून मनुष्याचा वर्ण ठरतो, जन्मावरून नव्हे, ही विचारधारा त्या काळी प्रबळ होती असे दिसते. महाभारतात आदी, वन, अनुशासन, शांती या पर्वात हा विचार पुनःपुन्हा आवर्जून सांगितलेला आहे. वेदाध्ययन, सत्यपरायणता, सदाचार इ. गुणांनी ब्राह्मणत्व येते, प्रजापालन, क्षात्रतेज, इ. गुणांमुळे मनुष्य क्षत्रिय होतो, कृषि, गोरक्षण, धनार्जन यामुळे वैश्य होतो, आणि वेदांचा त्याग, अमंगळ आचार यामुळे मनुष्य शुद्र ठरतो असे भृगृने सांगितले आहे. गुणांवरून वर्ण ठरावयाचा तर गुणांची परीक्षा होणे अवश्य ठरते. नाहीतर कोणाची प्रवृत्ती कशी आहे, हे कळण्यास मार्गच राहणार नाही. म्हणून या सर्व वर्णांना, म्हणजेच सर्व समाजाला, यज्ञाचा व वेदाध्ययनाचा अधिकार आहे, असे भृगूने आपले मत दिले आहे. 'ब्राह्मण हा सात्विक गुणांनी संपन्न नसेल तर शूद्र मानून, दास मानून त्याला वेठीला धरावे', 'हीन कुलात जन्मलेला शूद्र जर आगमसंपन्न असेल तर त्याला संस्कृत ब्राह्मण मानावे' असे विचार महाभारतात ठायीठायी आढळतात.

एक समाज
 समाज एकरूप करून टाकण्याचे प्राचीन ऋषिमुनींचे किती अट्टाहासाने प्रयत्न चालले होते हे यावरून दिसून येईल. अखिल भारतीयांना एका वैदिक यज्ञधर्माची दीक्षा त्यांनी दिली. संस्कृत वाणीचा आसेतुहिमाचल प्रसार करून ती वाणी वा अन्य तदुद्भव भाषा सर्वांच्या मुखी रूढ करून टाकल्या आणि एवढ्यावरच न थांबता या सर्वांचे रक्तही एक करून टाकण्याचा अत्यंत चिकाटीने त्यांनी प्रयत्न केला. असे दीर्घ प्रयत्न त्यांनी केले नसते तर भारत हा एक देश, भारतीय हा एक समाज आणि त्या सर्वांचा हिंदुधर्म हा एक धर्म, असे स्वरूप या भूमीला कधीच प्राप्त झाले नसते; आणि ही भूमी सामर्थ्यसंपन्नही झाली नसती. समाज एकरूप झाल्यावाचून, त्याच्यात समता नांदत असल्यावाचून तो संघटित व बलसंपन्न होणे दुर्घट असते. ऐतिहासिक काळात इ. स. पूर्व चौथ्या शतकापासून इ. सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतावर ग्रीक, शक, कुशाण, हूण इ. जमातींची महाभयंकर अशी नऊ आक्रमणे झाली. पण या सर्व आक्रमणांचे निर्दाळण करून या सर्व जमातींना स्वधर्मात व स्वसमाजात विलीन करून टाकण्यात भारतीयांनी अपूर्व यश मिळविले. या जमातींच्या आक्रमणांच्या आधीच हा समाज एकरूप झालेला नसता तर हे कधीही शक्य झाले नसते. नाग, द्रविड, असुर, कैवर्त, किरात, आंध्र, पुलिंद या ज्या शेकडो जमाती येथे प्राक्काळी होत्या त्या तशाच भिन्न रूपात व विघटितपणे येथे राहिल्या असत्या तर येथे कोणत्याच संस्कृतीचा विकास झाला नसता; आणि शक, यवन, कुशाण, हूण यांच्या आक्रमणाला त्या अगदी सहज बळी पडल्या असत्या. पण तसे तर झाले नाहीच, उलट या आक्रमकांना हतवीर्य करून भारतीयांनी आपल्या