पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१८४
 

आणि सावित्री तर सर्व पतिव्रतांचा आदर्श. जरत्कारू हा वेदवेत्ता, तपस्वी ब्राह्मण. त्याने वासुकी या नागराजाच्या भगिनीशी विवाह केला. त्यांचा पुत्र आस्तिक हाही वेदपारंगत, तपोनिष्ठ ब्राह्मण झाला, आर्य मानला गेला.

आदर्श
 म्लेंच्छ व यवन या अगदी परकीय भारतबाह्य व हीन जमाती मानल्या जातात. पण ययातीचा पुत्र तुर्वसू याची संतती ती यवन व दुसरा पुत्र अनू त्याची संतती ती म्लेंच्छ असे महाभारत सांगते (आदि ८५ - ३५ ). भृगू, अंगिरस, वसिष्ट, पौलस्त्य, पुलह इ. कुळे ही ब्राह्मणांची श्रेष्ठ कुळे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांतील शेवटच्या दोन कुळांत राक्षस, वानर, किन्नर, यक्ष, किंपुरुष, पिशाच्च इ. जमाती निर्माण झाल्या आहेत. शुक्राचार्यांची कन्या देवयानी दिव्याशी म्हणजे एका श्रेष्ठ ब्राह्मणकन्येशी ययाती या क्षत्रिय राजाने विवाह केला. त्याचप्रमाणे असुरांचा राजा वृपपर्वा याच्या कन्येशीही ययातीने ( मनाने ) विवाह केला होता. यावरून ब्राह्मण, क्षत्रिय व असुर हे एकवंशीय तरी असले पाहिजेत किंवा त्यांनी वर्णसंकर तरी केला असला पाहिजे. ययाती-देवयानी हा प्रतिलोम विवाह उत्तरकालीन धर्मशास्त्राप्रमाणे त्यांची प्रजा शूद्र ठरते. त्यांचा मुलगा यदू हा यादव कुलाचा मूळपुरुष होय. ययाती - शर्मिष्ठा हा वर्ण- संकर इतका मान्य झाला होता की कालिदासाने कण्वमुखाने शकुंतलेला आशीर्वाद असा दिला की तू शर्मिष्ठेप्रमाणे पतीला प्रिय हो व तिच्या पुरुराजाप्रमाणे तुलाही सम्राटलक्षणी पुत्र होवो. दैत्यकुळातील सावित्री व असुरकुळातील शर्मिष्ठा या आर्य स्त्रियांना आदर्श म्हणून सांगताना, प्राचीन कवींना अश्लाघ्य असे काहीच वाटले नाही.

गुणनिष्ठ वर्ण
 वेदकाळी व पुढेही अनेक शतके समाजात आजच्यासारखे वर्ण नसून ब्राह्मण, क्षत्रिय हे वर्ग होते, असे म. म. काणे यांसारख्या पंडितांचे मत आहे. त्यांचे म्हणणे प्रमाणसिद्ध आहे, हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. त्या काळी क्षत्रिय कुळात अनेक ब्रह्मर्षी निर्माण होत व ब्राह्मणकुळात अनेक राजर्षी निर्माण होत. वीतहव्य हा क्षत्रिय राजा भृगुऋषींच्या कृपेने ब्रह्मर्षी झाला. त्याचा पुत्र गृत्समद वेदातल्या काही सूक्तांचा कर्ता आहे. शौनक हा त्याच्याच कुळात जन्मला. त्याने चातुर्वर्ण्य निर्माण केले असे विष्णुपुराण सांगते. म्हणजे त्याच्या आधी ते नव्हते असे दिसते. शौनकाचा पिता शुनक याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सर्व वर्णांचे पुत्र होते. पुरुवंशात कोणी क्षत्रिय झाले, कोणी ब्राह्मण झाले. मांधाता, कक्षीव, अजमीढ हे सर्व ब्रह्मर्षी क्षत्रिय कुलोत्पन्न होते. नाभागाचे व या क्षत्रियांचे पुत्र पुढे वैश्य झाले.
 वरील इतिहास ध्यानात घेऊनच प्रारंभी एकच वर्ण होता व त्यातून गुणकर्म- भेदाने पुढे चार वर्ण निर्माण झाले, असे रामायण, महाभारत, भागवत, ब्रहापुराण,