पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९.
समाजरचना
 



अवयव अवयवी
 राजकारणाचा व धर्माचा विचार झाल्यावर आता महाराष्ट्राच्या समाजकारणाचा विचार करावयाचा आहे. राजकारणात प्रामुख्याने शास्ते व शासित यांच्या संबंधांचा विचार होतो तर समाजकारणात एकाच समाजाच्या भिन्न घटकांचे परस्पर-संबंध पाहावयाचे असतात. समाज अनेक घटक मिळून झालेला असतो. शरिरात ज्याप्रमाणे प्रथम पेशी, मग त्यांचे बनलेले स्नायू, अस्थी, मज्जा, त्वचा इ. घटक असतात आणि शरिराचे जीवन या घटकांच्या परस्पर संबंधांवर अवलंबून असते त्याचप्रमाणे समाजाचे आहे. प्रथम त्यात व्यक्ती असतात, त्यांचे कुटुंब बनलेले असते. अनेक कुटुंबे मिळून जाती होतात, अनेक जाती मिळून वर्ण किंवा त्यासारखे इतर संघ होतात आणि या सर्व घटकांचा मिळून समाज होतो. समाजाचे हे जे अनेक घटक त्यांचे परस्पर संबंध काय आहेत, त्यांच्यांतील भेद कोणत्या तत्त्वावर झालेले आहेत, ती तत्त्वे ग्राह्य आहेत की त्याज्य आहेत, त्याज्य असतील तर नवी कोणती तत्त्वे स्वीकारली पाहिजेत, ती का स्वीकारली पाहिजेत, याचे जे विवेचन ते समाजकारण होय. थोडक्यात म्हणजे अवयवी जो समाज व त्याचे अवयव जे वरील घटक त्यांच्या परस्परसंबंधांचे जे शास्त्र ते समाजरचनाशास्त्र किंवा समाजकारण होय.

विषयाचा व्याप
 व्यक्ती, कुटुंब, जाती आणि वर्ण हे आपल्या समाजाचे आज हजारो वर्षे घटक आहेत. त्यांच्या परस्पर संबंधांचा विचार करताना आणखीही बऱ्याच तपशिलात