पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१८०
 

आहे, धर्मशास्त्रातही शब्द प्रामान्य नसावे, अशी फार हितकर वचने त्यांनी समाजाला ऐकविली (इ. स. ८२० ते ९००). पण हा दृष्टिकोण पुढे नष्ट झाला. आणि भारताच्या शास्त्रांची स्थिती साचलेल्या पाण्यासारखी झाली. येथील विद्या ही गत वैभवावर अवलंबून राहू लागली. वाङ्मय हे बाह्यनिष्ठ झाले. त्यातील चैतन्य गेले. प्रतिभेऐवजी त्यात पांडित्य दिसू लागले व ते जीवहीन झाले. सर्व क्षेत्रांतच भारतीयांची अशी स्थिती झाली. त्यामुळे आपल्यावर कोणती अनर्थपरंपरा कोसळत आहे, कोसळणार आहे याचे आकलन करण्याची शक्तीच त्यांना राहिली नाही.'
 सातवाहन ते यादव या कालखंडातील धार्मिक जीवनात कसकशी स्थित्यंतरे होत गेली व धर्माला विकृत रूप आल्यामुळे शेवटी भारताचा व महाराष्ट्राचा अधःपात कसा झाला ते येथवर केलेल्या विवेचनावरून कळून येईल.