पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१८२
 

आपणास शिरावे लागेल. व्यक्तीपेक्षा कुटुंब मोठे व कुटुंबापेक्षा जाती व्यापक असे जरी असले तरी व्यक्तीचा स्वतंत्रपणे संबंध यांतील प्रत्येक वरच्या घटकाशी असतो. म्हणून व्यक्तीचा कुटुंबाशी, जातीशी, वर्णाशी, आणि शेवटी समाजाशी संबंध काय आहे याचाही विचार करणे अवश्य होते. व्यक्ती व समाज यांचे संबंध हा तर समाजकारणाचा फार महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष संबंध हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री व पुरुष या स्वतंत्रपणे दोन व्यक्तीच असल्या तरी ते अत्यंत भिन्न घटक असल्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे. या एकंदर दृष्टीने व्यक्तिस्वातंत्र्य (व्यक्ती व समाज यांने संबंध), विवाहसंस्था (स्त्री-पुरुष संबंध), जातिसंस्था, वर्णसंस्था, स्पृश्यास्पृश्यता यांचा विचार हा समाजकारणाचा विषय आहे. समाजाची संस्कृती व त्याचा उत्कर्ष या भिन्न घटकांचे परस्पर- संबंध त्यांवर फार अवलंबून असतात. हे सर्व ध्यानी ठेवून इ. स. पूर्व २५० ते इ.स. १३०० या कालखंडातील महाराष्ट्राच्या समाजरचनेचा आता आपल्याला अभ्यास करावयाचा आहे.

महाराष्ट्र समाज
 भारतातील कोणत्याही प्रदेशाच्या समाजरचनेचा विचार करावयाचा म्हणजे प्रथम चातुर्वर्ण्याचा विचार करावा लागतो. हिंदुसमाज म्हणजे चातुर्वर्ण्य आणि चातुर्वर्ण्य म्हणजे हिंदुसमाज अशी अभिन्नता आज हजारो वर्षे आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. उत्तर भारतातील आर्यांनीच इ. पू. सातव्या सहाव्या शतकात येथे येऊन वसाहती केल्या, हे मागे पहिल्या प्रकरणात सांगितलेच आहे. त्यांनी येताना आपल्या बरोबर आपल्या सर्व जीवनाचे तत्त्वज्ञान आणलेच होते. आणि चातुर्वण्यांकित समाज- रचना हे त्यातले फार मोठे तत्त्व असल्याने, तेही त्यांच्या बरोबर आले होते. येथे आल्यावर येथले आदिवासी जे नाग, कातकरी, ठाकूर, वारली यांच्याशी त्यांचे दृढ संबंध येऊ लागले व त्यातूनच महाराष्ट्र समाज निर्माण झाला. त्या समाजाचे स्वरूप आता पाहावयाचे आहे

एकरूप प्रयत्न
 आर्य हे भारतात बाहेरून आले की ते येथलेच मूळचे रहिवासी होते याविषयी फार वाद आहेत, पण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने ते अप्रस्तुत आहेत. आर्य हा स्वतंत्र वंश होता किंवा काय हा दुसरा प्रश्न आहे. त्याला मात्र महत्त्व आहे. आर्य हे नाव वंशवाचक आहे व भारतातले मूळचे द्रविड, अमुर, नाग इ. लोक आर्याहून भिन्न वंशाचे होते, हे युरोपीय पंडितांचे मत अगदी निराधार आहे, हे ज्ञानकोश- कारांनी व इतर अनेक पंडितांनी आता निर्णायकपणे दाखवून दिले आहे. या पंडितांच्या मते आर्य शब्द हा गुणवाचक आहे, जातिवाचक नाही. सुसंस्कृत, प्रभू, श्रेष्ठ