पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७९
धार्मिक जीवन
 

काही सांगता येत नाही. तरी आज उपलब्ध झालेल्या साधनांच्या आधारे, या विकृत धर्माचा प्रभाव इ. सनाच्या अकराव्या बाराव्या शतकात पडू लागला व तेव्हा पासूनच हिंदुसमाजाचा ऱ्हास होऊ लागला, असे बऱ्याच निश्चयाने म्हणता येते. या ऱ्हासासंबंधी आमच्या थोर पंडितांची मते देऊन हे प्रकरण आता संपवितो.

डॉ. काणे
 म. म. काणे यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या ५ व्या खंडात हिंदूंच्या अधःपाताची मीमांसा केली आहे. प्रथम त्यांनी अत्यंत भेदक असे तीन प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात (१) ग्रीक, शक, कुशाण, टर्क, इंग्लिश यांनी हिंदूंवर आक्रमणे केली त्या वेळी प्रत्येक खेपेस आपण हीनबल का ठरलो ? (२) अखिल भारताचे एक राष्ट्र करून येथे दीर्घ काल आपल्याला एक शासन का स्थापिता आले नाही ? आणि (३) येथल्या नैसर्गिक संपत्तीचा शोध करून, तिचा उपयोग करून, आपण व्यापार व कारखानदारी यांत अग्रेसर का झालो नाही ? या प्रश्नांचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. नुसती पूर्वीच्या वैभवाची गाणी गाऊन भागणार नाही. असे सांगून कारण- मीमांसा करताना ते म्हणतात, 'भारताचे एक राष्ट्र झाले नाही याचे एक कारण असे की आपल्या बहुतेक आचार्यांनी व संतांनी परलोक व वेदांत यावर अतिरेकी भर दिला, त्या मानाने व्यक्तीची स्वतःविषयीची, कुटुंबासंबंधीची व समाजाविषयीची कर्तव्ये यांवर दिला नाही किंवा यांचे महत्त्व यांनी मानलेच नाही. त्यामुळे जो उठतो तो परमार्थी होतो व ऐहिक उत्कर्षाची निष्ठेने चिंता करीत नाही अशी स्थिती झाली.' (पृ. १६२० - २२) याचा अर्थ असा नव्हे की आपण खरे परमार्थी झालो. आपल्या तत्त्वज्ञानात व आपल्या आचारात जमीनअस्मानाचा फरक असतो. प्रत्येक अणु- रेणूत परब्रह्म आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असे आपले तत्त्व आणि आचरणात मात्र पराकाष्ठेची विषमता, हीन जातीयाविषयी तुच्छता ! आपल्या समाजाच्या विघटनेचे व विनाशाचे, हे काणे यांच्या मते, एक मोठे कारण आहे.

डॉ. मुनशी
 डॉ. कन्हय्यालाल मुनशी यांनी, 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि हिंदू पीपल या ग्रंथाच्या ४ थ्या व ५ व्या खंडाच्या प्रस्तावनेत या काळात भारतात धर्माचा ऱ्हास कसा होत गेला याचे मोठे मौलिक विवेचन केले आहे. सारार्थाने ते पुढे देतो. ते म्हणतात, 'इ. स. १००० च्या सुमारास प्राचीन भारताचा अंत झाला. गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्यांमुळे हिंदुसंस्कृती हादरून गेली. यावेळी धर्मशास्त्राचा एक निष्प्राण सांगाडा झाला होता. मेधातिथी या मनूच्या प्रसिद्ध टीकाकाराने त्यात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला होता. राजसत्ता ही ईश्वरदत्त नसून लोकदत्त असते, राजनीतिशास्त्र हे अनुभवाधारे रचावे, शूद्रालाही राजा होण्याचा अधिकार