पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१७८
 

भारतात रूढ होते. साम्राज्यासाठी, धर्मप्रसारासाठी व व्यापारासाठी हिंदू लोक इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकापर्यंत जगभर संचार करीत होते. धर्मशास्त्रालाही ते मान्य होते. हा विश्वसंचार कलियुगातच होत होता, तरी कलिवर्ज्यकाराने तो कलीत निषिद्ध ठरविला आणि हिंदुसमाजाने तो निषेध मानून प्रत्यक्षात नसलेले कलियुग निर्माण करून ठेविले. पतितपरावर्तनाच्या बाबतीत हेच घडले. परधर्मात गेलेल्यांना, पतितांना, हिंदुसमाज पूर्वी थोड्या प्रायश्चित्ताने परत स्वधर्मात घेत असे. बलात्काराने झालेले धर्मांतर हे धर्मांतरच नव्हे, असे मनूने म्हटले आहे. सिंधमध्ये महंमद कासीमने सक्तीने बाटविलेल्या हजारो हिंदूंना, देवल ऋषींनी नवी स्मृती रचून शुद्ध करून घेतले. असे असून कलिवर्ज्य प्रकरणाने पतितपरावर्तन निषिद्ध ठरविले. हिंदुसमाजाने ती आज्ञा वंद्य मानली व एकदा बाटलेले हिंदू कायम मुस्लिम किंवा ख्रिस्ती राहण्याची सोय करून ठेवली आणि या समाजाच्या विनाशाची योजना आखून टाकली.

धर्मविकृती - नाश
 सातवहान ते यादव या दीड हजार वर्षांच्या कालखंडात आरंभीची हजार बाराशे वर्षे अत्यंत पराक्रमी व वैभवशाली असलेला महाराष्ट्र त्या काळाच्या अखेरीस परकी आक्रमणास दीर्घ काल बळी पडण्याइतका दीनदुबळा, नालायक व कर्तृत्वहीन कशामुळे झाला याची चिकित्सा आपण करीत आहो. त्या चिकित्सेत, या विनाशाची बीजे त्या काळी हिंदुधर्माच्या विकृतीत आहेत, असे आपल्या ध्यानात आले. प्रारंभीच्या अनेक शतकांत येथला धर्म प्रवृत्तिवादी, उत्साहदायक, बुद्धिप्रामाण्यवादी, दृष्टफलनिष्ठ, देशकाल पाहाणारा, परिवर्तनशील, मानवी कर्तृत्वावर श्रद्धा ठेवणारा, नीतिनिष्ठ व समाजधारणाची चिंता वहाणारा असा होता. आठव्या शतकात कुमारिलभट्टाने प्रवर्तित केलेल्या मीमांसापद्धतीने या धर्माचे स्वरूप हळूहळू पालटले. शब्दप्रामाण्य, अपरिवर्तनीयता, दृष्टफलद्वेष हे महादोष त्यात शिरले. आचार्यपरंपरेने या धर्माला निवृत्तिवादी बनविले. पुराणांनी त्याला जड कर्मकांडाचे निंद्य रूप दिले. आणि कलिवर्ज्य प्रकरणाने कलियुगाची आत्मविश्वास नष्ट करणारी, प्रयत्नवादाची हानी करणारी कल्पना रूढ करून, पतितपरावर्तन, समुद्रगमन, सहभोजन, यासारख्या पोषक धर्माचारांचा निषेध करून, हिंदुधर्माला अत्यंत अधोगामी असे रूप दिले. या विकृत धर्माची तत्वे जसजशी हिंदुसमाजाने स्वीकारली तसतसा त्याचा अधःपात होऊ लागला. घातक तत्त्वे किंवा विचारपद्धती जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा लगेच त्या स्वीकारल्या जातात असे नाही. बुद्धानंतर तीनशे वर्षांनी त्याचा अहिंसावादी धर्म भारतभर अशोकाने प्रसृत केला. ख्रिस्ती धर्माचा प्रसार ख्रिस्तानंतर तीनशे वर्षांनी कान्स्टंटाईन राजाने केला. आणि तोही पूर्व युरोपात. पश्चिम युरोपात त्याचा प्रसार होण्यास आणखी दोन तीन शतके लागली. भारतात इतिहासाची पूर्वकाळी आस्था नव्हती, तेव्हा नेमके