पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७७
धार्मिक जीवन
 


कलियुगकल्पना
 कलियुग ही कल्पनाच समाजाला अत्यंत घातक आहे. मनुष्य हा कालबद्ध आहे, परतंत्र आहे, त्याने कितीही पराक्रम केला, प्रयत्न केला तरी कलियुग हा काळच अधोगामी असल्यामुळे त्याला कदापि यश यावयाचे नाही, असा याचा अर्थ होतो. हीच कल्पना गेली हजार वर्षे हिंदुसमाजाच्या मानगुटीस बसलेली आहे व त्याच्या दौर्बल्यास कारण झालेली आहे. इतिहास पहाता इ. स. १००० च्या पूर्वी भारतात कोणत्याही धर्मशास्त्रज्ञाने ती मानलेली आहे असे दिसत नाही. सत्य, त्रेता, द्वापर व कली ही युगनामे पूर्वीच्या ग्रंथांत येतात. पण ही युगे राजाच्या कर्तबगारीवर अवलंबून आहेत, त्याने उत्तम दण्डनीतीचा अवलंब केला तर तो कृतयुग निर्माण करील, नाहीतर मात्र कलियुग येईल, असेच महाभारत, मनुस्मृती इ. प्राचीन ग्रंथ सांगतात. मेधातिथी हा नवव्या शतकातील मनूचा टीकाकार, त्यानेही युगकल्पना राजाने मानू नये, कारण युगे राजाच्या वर्तनावर अवलंबून असतात, असे म्हटले आहे. विज्ञानेश्वर हा अकराव्या शतकातला याज्ञवल्क्याचा टीकाकार, त्यानेही कलियुगाचा सध्याचा रूढ अर्थ कोठेही मान्य केलेला नाही. तेव्हा कालप्रवाहानेच अधःपाताला नेणारे युग म्हणजे कलियुग असा अर्थ पूर्वसूरींना मान्य नव्हता हे स्पष्ट आहे.
 दुसरे असे की आजच्या युगकालगणनेचा विचार केला तर भारती युद्धानंतर लगेच कलियुगाला प्रारंभ झाला आहे असे दिसेल. म्हणजे महाभारत, स्मृती, पुराणे हे सर्व ग्रंथ कलियुगातच झालेले आहेत. तरी कलियुगाची ४२०० वर्षे उलटून जाईपर्यंत म्हणजे कलिवर्ज्य प्रकरण जन्माला येईपर्यंत एकाही ग्रंथकाराला त्याची कल्पना नव्हती असे दिसते. आणि कलिवर्ज्यकार या ग्रंथकारांनी कलियुगात रचलेल्या ग्रंथातल्याच कित्येक आज्ञा कलियुगात मानू नयेत असे सांगत आहे. तेव्हा कलीच्या आरंभकाळी धर्मवेत्त्यांनी हे नियम रचले हे त्याचे म्हणणे खोटे आहे हे उघड आहे. पराशरस्मृतीत तर मी हे धर्मनियम कलियुगासाठीच सांगतो असे स्मृतिकाराने म्हटले आहे. तरी, शूद्राचे अन्न खाण्यास हरकत नाही, काही प्रसंगी विधवेला पुनर्विवाह विहित आहे, हे त्याचे धर्मनियम कलिवर्ज्यकाराने कलियुगात मानू नयेत असे सांगितलेले आहे.

करंटेपणा
 यावरून कलिवर्ज्य प्रकरणाला प्रामाण्य कसलेच नाही, हे उघड आहे. पुढील काळच्या काही निबंधकारांनीसुद्धा त्याच्या प्रामाण्यावर आक्षेप घेतलेले आहेत. तरी दुर्दैव असे की आधीच्या शास्त्रकारांनी समाजाला अत्यंत पोषक असे जे धर्मसिद्धान्त सांगितले होते ते कलिवर्ज्यकारांनी कलिवर्ज्य ठरविले आणि हिंदुसमाजाने त्या प्राचीन शास्त्रज्ञांना अप्रमाण मानून या करंट्या निबंधकाराला प्रमाण मानले. समुद्रगमन पूर्वी