पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७५
धार्मिक जीवन
 

पुराणे सांगत. या भक्तिमार्गाला पुढच्या काळात जड कर्मकांडाचे रूप आले. वेदांतील यज्ञधर्माला पुढे जसे अत्यंत जटिल व जड रूप प्राप्त झाले त्याचप्रमाणे पुराणातील भक्तिमार्गाचे होऊन त्यातील चैतन्य नष्ट झाले. अमूर्त परमेश्वराचे ध्यान करता येत नाही, म्हणून सगुण मूर्तीचा आश्रय करावा, असे धर्मवेत्यांनी सांगितले. पण पुढे मूर्तिपूजा ही यज्ञप्रक्रियेप्रमाणेच जटिल होऊन तिचे अवडंबर माजले. प्रत्येक देवतेच्या आवडीनिवडी ठरल्या. फुले, नैवेद्य, अभिषेक, प्रदक्षिणा निश्चित झाल्या. त्यावर ग्रंथ झाले आणि या पूजाविधीत व प्रसादभक्षणात जरा कोठे प्रमाद झाला तर देव कोपून शाप देऊ लागले, त्याचप्रमाणे देवांचे रागलोभही ठरून जाऊन त्यांचे भोगविलास मानवांपेक्षाही जास्त काममोहमय होऊ लागले. यामुळे देवस्थाने ही पुजारी लोकांची मिरासदारी होऊन सामान्य जनतेला देव अंतरला. साधा भक्तिभाव हे मूर्तिपूजेचे रूप जाऊन तिचे जड कर्मकांड झाले.

व्रते वैकल्ये
 व्रते वैकल्ये, उद्यापने, प्रायश्चित्ते, उपासतापास यांनाही असेच जडरूप प्राप्त झाले. यांचे माहात्म्य गाणारांनी अगदीच ताळतंत्र सोडले. वेदशास्त्राचे अध्ययन केले तरी, वैशाखस्नान केले नाही तर त्या अध्ययनाचा काही उपयोग नाही, असे पुराणे सांगू लागली. एकादशी व्रत मोठे सोज्ज्वळ हे खरे. पण त्याचे वर्णन करताना लोक मद्यप्यासारखे बोलू लागले तर परिणाम काय होईल ? एक वेळ मातृगमन केलेले चालेल, गोमांसभक्षणही विहित ठरेल, पण एकादशीला भोजन करणे मात्र महापाप होय (कालतरंगिणी ). असे कोणत्याही धार्मिक आचाराचे महत्व सांगताना उपदेशकांनी नीतितत्त्वांची, चारित्र्याची अवहेलना केली, मनोनिग्रह, सात्त्विक बुद्धी यांना हेटाळले, तर समाजाचा ऱ्हास झाल्याखेरीज राहाणार नाही. व्रतांचे माहात्म्य सांगणाऱ्या ग्रंथांत पुढे ही प्रवृत्ती दिसू लागली. ब्राह्मणांचा महिमा पुराणांना सांगावयाचा होता. चारित्र्यसंपन्न तपोनिष्ठ ब्राह्मणांचा त्यांनी महिमा गायिला असता तर ते श्लाध्यच होते. पण व्रतांच्या उद्यापनाला बोलविताना ब्राह्मणांच्या गुणावगुणांची चिकित्सा करू नये असे पुराणे सांगू लागली ! अधःपात याहून काही निराळा नसतो.

असहिष्णुता
 पण पुराणांचे सर्वांत मोठे अपकार्य म्हणजे त्यांनी शैव, वैष्णव, शाक्त असे परस्पर- वैर करणारे पंथ स्थापून जातिभेद, धर्मपंथभेद यांनी विघटित होत चाललेल्या हिंदु- समाजाचे विघटन पुरे करून टाकले. हिंदुधर्म हा सहिष्णू आहे अशी त्याची कीर्ती आहे. सातवाहनादी सर्व राजघराण्यांनी स्वतः वैदिक धर्माची ती अभिमानी असूनही जैन, बौद्ध या पंथांना अत्यंत सहिष्णुतेने, आदराने वागविले. वेद, गीता यांचे हे संग्राहक धोरण प्रसिद्धच आहे. पण पुराणकारांची धर्मबुद्धी पुढे फिरली. किंवा बुद्धी