पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१७४
 

कमीत कमी बारा पुरुषांचे तरी हे ग्रंथ असले पाहिजेत. त्या सर्व ग्रंथांतील प्रत्येक वाक्यात ब्रह्म, आत्मा, माया, संसार, मोक्ष, मोक्षमार्ग या प्रत्येक विषयासंबंधी तंतोतंत एकमत आहे असे दाखविण्याचा अट्टाहास करणे हे स्मृतिवचनांची एक- वाक्यता करण्याइतकेच मानवी बुद्धीला, प्रज्ञेला, तर्कशक्तीला घातक आहे, अवमान- कारक आहे. तिच्याप्रमाणेच हीही बुद्धिहत्या आहे. शब्दप्रामाण्याचा हा अगदी कळस होय. हे आत्यंतिक प्रामाण्य मानवाच्या स्वतंत्र प्रज्ञेची वाढ कुंठित करते आणि अंती तिच्या नाशास कारण होते. आचार्य परंपरेच्या समन्वयपद्धतीमुळे भारतात हेच घडले. भारताची जनता, येथील धर्मधुरीण व येथील राज्यकर्ते प्रज्ञाहत होऊन येथल्या विद्या, येथल्या कला, येथली राजनीती येथला पराक्रम या सर्वांचाच लोप झाला. आणि दीर्घकालीन पारतंत्र्य या भूमीच्या नशिबी आले.

पुराण - विकृती
 मीमांसापद्धती आणि निवृत्तिपरंपरा यांचा येथवर विचार झाला. आता पुराणांनी पुढच्या काळात धर्माला कसे विकृतरूप दिले त्याचा विचार करून हे विवेचन संपवू. वर एके ठिकाणी सांगितलेच आहे की कोणत्याच पुराणाचा काळ निश्चित सांगता येत नाही. आणि पुराणांत लोक सारखी भर घालीत राहिल्यामुळे कोणती विचारसरणी, कोणते तत्त्व, कोणी कोणत्या काळात सांगितले, याचाही पत्ता लावता येत नाही. पुराणांत भिन्न विचारप्रवाह आलेले आहेत. त्यांतील काही अनिष्ट विचारप्रवाहांचा जोर उत्तर काळात झाला एवढेच म्हणता येईल. अर्वाचीन भारतात लोकहितवादी, रानडे यांच्या काळापासून राष्ट्रनिष्ठेची शिकवण दिली जात होती. तिचा प्रभाव वाढत जाऊन अखिल भारतभर सर्वांच्या चित्तांत ती प्रबळ झाली तेव्हा स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला. पण स्वातंत्र्यानंतरच्या तीस वर्षात तिचा आता संपूर्ण लोप झाल्यासारखे दिसत आहे. तेव्हा एखाद्या तत्त्वाचे, निष्ठेचे, विचाराचे प्रतिपादन केव्हा झाले याला महत्व नसून समाजात ते प्रभावी केव्हा झाले याला महत्त्व आहे. जर्मनीत सोळाव्या शतकापासून एकराष्ट्रीयत्वाचे प्रयत्न होत होते. पण सर्व ख्रिस्ती जग एक असे मानणाऱ्या होली रोमन एंपायरच्या कल्पनेचा तेव्हा जोर होता. त्याचप्रमाणे पंडितांच्या मनात विश्वराष्ट्राच्या कल्पनांची मोहिनी होती. नेपोलियनने १८०६ साली जर्मनीचा पराभव केला, तेव्हा सर्व जर्मनांचे डोळे उघडले व राष्ट्रनिष्ठेच्या तत्त्वाचा त्या देशात अत्यंत वेगाने प्रसार झाला. मीमांसा, निवृत्ती, पुराणधर्म यांच्या लोकांवरील परिणामांचा अभ्यास करताना, याच पद्धतीने विचार करावा, असे वाटते.

भक्ती - कर्मकांड
 पुराणांनी प्रामुख्याने भक्तिमार्गाचा पुरस्कार केला होता. शिव, विष्णू, देवी, गणेश इ. अनेक देवतांचे माहात्म्य गाऊन, त्यांची उपासना केल्याने मोक्ष मिळेल, असे