पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७३
धार्मिक जीवन
 

हा सिद्धान्त श्री शंकराचार्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी गीतेवर भाष्य लिहून तिचा निवृत्तिपर अर्थ लावला. त्या काळी उपनिषदे, ब्रहासूत्रे व गीता हे ग्रंथ अत्यंत पूज्य मानले जात असत. ज्याला आपले काही मत समाजात मांडावयाचे असेल त्याला या तीन ग्रंथांवर (त्यांना प्रस्थानत्रयी असे म्हणत ) भाष्य लिहून, त्यां सर्वांचा तात्पर्यार्थ एकच असून त्यांनी आपल्याच मताचा पुरस्कार केला आहे, असे सिद्ध करावे लागत असे. श्री शंकराचार्यांनी हाही उद्योग करून, प्रस्थानत्रयीवर निवृत्तिपर भाष्ये लिहून, सर्व भारतभर संन्यासवादाचे तत्त्वज्ञान दृढमूल करून टाकण्याचा फार मोठा प्रयत्न केला श्री शंकराचार्य आठव्या शतकात होऊन गेले. त्यानंतर श्री रामानुज ( इ. स. १०१६ ), निंबार्क ( इ. स. १९६२), श्री मध्वाचार्य ( इ. स. ११९७ ), आणि श्री वल्लभाचार्य (इ. स. १४७९ ) हे जे भिन्न भिन्न पंथांचे आचार्य होऊन गेले त्यांनी सर्वांनी संन्यासवादाचा नसला तरी निवृत्तिवादाचाच पुरस्कार केला. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याविषयी या आचार्याची भिन्न भिन्न मते होती. पण संसार असार असून त्याचा त्याग केल्यावाचून मोक्षलाभ शक्य नाही याविषयी सर्वांचे एकमत होते. यांपैकी कोणी ज्ञानमार्गी होते, कोणी भक्तिमार्गी होते. पण संसार - निवृत्ति- विषयी मतभेद कोणाचाच नव्हता. ज्ञानोत्तर ज्ञानी, मुक्त माणसाने लोकसंग्रहासाठी आमरण कर्म केली पाहिजेत, असा आग्रह यांपैकी कोणीच धरलेला नाही. त्यावरून हे सर्व आचार्य मोक्षैकनिष्ठच होते असे दिसून येते. धर्मवेत्ते मोक्षैकनिष्ठ झाले म्हणजे समाजही हळूहळू तसाच होतो व मग धर्माला व्यक्तिनिष्ठ रूप येऊन समष्टिधर्माचा लोप होतो. आणि मग समाजाचे विघटन सुरू होऊन अंती तो दुर्बल होऊन नाश पावतो. आठव्या शतकापासून उदय पावलेल्या आचार्य परंपरेने उपदेशिलेल्या निवृत्तिवादाचा हाच परिणाम झाला. त्यानंतर अखिल भारतात आणि महाराष्ट्रात संतपरंपरा निर्माण झाली. तिचे तत्वज्ञान निवृत्तिवादाचेच होते. त्यामुळे भारतातील लोकांची विजिगीषा, पराक्रम, साम्राज्याकांक्षा, वनवैभवाची स्पृहा समूळ नष्ट झाली. पण संत वाङ्मयाचे विवेचन पुढे बहामनी कालखंडात यावयाचे असल्यामुळे येथे त्याचा विस्तार करीत नाही. दहाव्या अकराव्या शतकात हिंदू समाजाचा जो ऱ्हासकाळ सुरू झाला त्याची कारणमीमांसा आपण करीत आहो, मीमांसापद्धती- इतकेच आचार्यांचा निवृत्तिवाद हे महत्वाचे कारण आहे, हे येथे सांगावयाचे आहे.

समन्वयपद्धती
 आचार्य परंपरेने प्रस्थानत्रयीवर जी भाष्ये लिहिली त्यांतून दुसरेही एक अनिष्ट निर्माण झाले. सर्व स्मृतींची एकवाक्यता करण्याची निबंधकारांची जी समन्वय- पद्धती तिचा त्यांच्या इतक्याच निष्ठेने आचार्यांनीही अवलंब केला. दहा उपनिषदे ही निरनिराळ्या काळी रचली होती. त्यानंतर बऱ्याच काळाने गीता जन्मास आली. आणि त्यानंतर ब्रह्मसूत्रे लिहिली गेली. म्हणजे हजार एक वर्षांच्या कालखंडातील