पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१७२
 

नीतिहीन कर्मकांड यांमुळे धर्माला किती विकृत रूप आले असेल व त्यामुळे समाजाचा कसा अधःपात झाला असेल याची वरील विवेचनावरून सहज कल्पना येईल. सातवाहन, यादव कालखंडाच्या अखेरीस हिंदुसमाजाच्या सामर्थ्याचा वैभवाचा, व त्याच्या स्वातंत्र्याचा नाश झाला त्याचे हे प्रधान कारण आहे.

संन्यासवाद
 हिंदुसमाजाच्या ऱ्हासाचे मीमांसापद्धतीइतकेच दुसरे महत्वाचे कारण म्हणजे याच मुमारास निवृत्तिवादी, संन्यासवादी, आचार्यांची निर्माण झालेली परंपरा हे होय. वेदकाळी आर्य लोक, प्रवृत्तिवादी, विजिगीषू, धनवैभवस्वराज्यसाम्राज्याची आकांक्षा धरणारे असे होते. संसार मायामय असून मनुष्याने ज्या क्षणाला वैराग्य येईल त्या क्षणाला संन्यास घ्यावा, संसारत्यागावाचून मोक्ष नाही, ही विचारसरणी प्रथम उपनिषदांनी रूढ केली. त्यातही कठ, ईशावास्य इ. उपनिषदे प्रवृत्तीचे व कर्मयोगाचे प्रतिपादन करतातच. पण एकंदर उपनिषदांचा कल निवृत्तीकडे आहे असे दिसते. त्यानंतरच्या काळात या उपनिषदांचे दोहन करणाऱ्या गीतने कर्मयोगाचा निःसंदिग्ध पणे पुरस्कार केला. आणि भगवान श्रीकृष्णांचा अधिकार फार मोठा असल्यामुळे या कर्मयोगाच्या तत्त्वाचा प्रभाव पुढे अनेक शतके टिकून राहिला. सूत्रवाङ्मय व त्यानंतरचे स्मृतिवाङ्मय व महाभारत, त्याचप्रमाणे चाणक्यासारखे राजनीतिशास्त्रज्ञ यांनी सर्वांनी प्रवृत्तिवादाचाच परिपोष केला आहे. त्यामुळेच भरतखंडात इ. सनाच्या दहाव्या बाराव्या शतकापर्यंत पराक्रमाची, साम्राज्याची, विश्वविजयाची परंपरा टिकून राहिली. बौद्ध व जैन या पंथांनी आत्यंतिक निवृत्तिवादाचा उपदेश केला आहे हे खरे. त्याचा अशोकाने अत्यंत हिरीरीने पुरस्कार केला आणि त्यामुळे शकयवनाच्या आक्रमणाला हा देश काही काळ बळीही पडला. पण त्याच सुमारास महाभारताची रचना होऊन प्रवृत्तीचा जोर पुन्हा वाढला व उत्तरेत शुंग व दक्षिणेत सातवाहन यांनी भारताला त्या महान आपत्तीतून वाचविले. हीच परंपरा उत्तरेत दहाव्या व दक्षिणत तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालू होती. त्यानंतर रजपूत, विजयनगर, मराठे यांनी हिंदूंचे उत्थापन करून मधून मधून या देशाचे रक्षण केले हे खरे. पण एकंदर हिंदुसमाजाची जीवनशक्ती अकराव्या शतकापासून क्षीण होत गेली हे खरे आहे. ती का क्षीण झाली याचीच कारणे आपण शोधीत आहोत, त्यांतील पहिले कारण कुमारिल भट्टाची मीमांसापद्धती हे असून दुसरे म्हणजे निवृत्तिवादी आचार्य परंपरा हे होय, असे वर म्हटले आहे.
 या आचार्यपरंपरेला श्रीमत् आद्य शंकराचार्यांपासून प्रारंभ झाला. महाभारत व स्मृती यांची परंपरा प्रवृत्तीची, कर्मयोगाची व ऐश्वर्योपासनेची होती. श्री शंकराचार्यांच्या आधी गीतेवर जी भाष्ये झाली तीही कर्मयोगपरच होती असे लो. टिळकांनी गीतारहस्याच्या पहिल्या प्रकरणात दाखवून दिले आहे. पण वैदिक कर्मयोगाचा