पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७१
धार्मिक जीवन
 

आज्ञा शिरसावंद्य मानिली. शतकाशतकाच्या अंतराने झालेल्या, देशकालाप्रमाणे धर्मात परिवर्तन केले पाहिजे असा आग्रह धरणाच्या, एकमेकींच्या मतांचे खंडन करणाऱ्या अशा सर्व स्मृतींची एकवाक्यता करणे ही खरोखर मानवी बुद्धीची हत्या आहे. ती ज्या समन्वयपद्धतीने केली ती समाजाच्या घातास कारण झाली, यात नवल काय ? पतिनिधनानंतर स्त्रीने सती जावे असे एक वचन व जाऊ नये असे दुसरे. टीकाकार म्हणाले सती जाऊ नये या वचनाचा अर्थ भिन्न चितेवर जाऊ नये, असा आहे. त्याच चितेवर जाण्यास हरकत नाही ! याचे नाव समन्वय ! पती नाहीसा झाला, मृत्यू पावला, त्याने संन्यास घेतला तर स्त्रीने दुसरा पती करावा असे एक वचन आहे; स्त्रीला पुनर्विवाह वर्ज्य असे दुसरे आहे. यांतील पहिल्या वचनातील 'पती' या शब्दाचा अर्थ, मेधातिथीसारख्या काहीशा स्वतंत्रबुद्धीच्या टीकाकारानेही, 'पालक' असा करून दोन्ही वचनांची एकवाक्यता केली आहे. शब्दप्रामाण्य या थराला नेऊन, या धर्मशास्त्रज्ञांनी मानवी बुद्धीची जाणूनबुजून हत्या केली आहे.

अदृष्टवाद
 मीमांसकांचा अदृष्टवाद हा असाच अनर्थाला कारण झालेला आहे. धर्माने धारण होते की नाही, समाजाची प्रगती होते की नाही, त्याचे फल मिळते की नाही हे पाहूनच धर्मनियमांचे विवेचन करावे, असे महाभारतकारांचे व स्मृतिकारांचे मत होते. धर्मामुळे अर्थकामांचा लाभ होतो म्हणून तुम्ही धर्म आचारावा, असे व्यास म्हणतात. मीमांसकांनी हे सर्व पालटून टाकले. या जगात ज्यांचे फल दिसते अशा आज्ञा धर्मात नसतातच, धर्माची फले परलोकात मिळावयाची असतात. ती अदृष्ट असतात. तेव्हा धर्मवचनांच्या यशापयशाची चिकित्सा मानवी बुद्धीला करणेच शक्य नाही असा त्यांचा सिद्धान्त आहे. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांच्या मते धर्माच्या अवनतीस येथूनच प्रारंभ झाला. ते म्हणतात, 'वेदापासून चालत आलेली दृष्टार्थतेची परंपरा सोडून देऊन सर्व धर्मक्रिया जेव्हा मेल्यानंतरच मिळणाऱ्या पारलौकिक फळाकरता आणि पुरुषबुद्धीस न कळण्याजोग्या कार्यास्तव असल्याचे ठरविले जाऊ लागले तेव्हापासून धर्माच्या अवनतीस प्रारंभ झाला. ऐहिक व्यवहाराला काही निर्बंध न राहून त्यात वाटेल तसे वागावे अशी प्रवृत्ती होऊ लागली. व्यवहारात अत्यंत अनीतिमान ठरलेले लोकही केवळ अदृष्टप्रधान व्रतवैकल्ये करून धार्मिकपणाचा टेंभा मिरवू लागले. निबंधकारांनी हे दोष लक्षात घेऊन, तसेच मानवी प्रवृत्ती व प्राचीन परंपरा यांचा विचार करून स्मृतिकारांप्रमाणेच इहलोक व परलोक यांची सांगड घातली असती तर आजच्या बुद्धिप्रधान युगातही धर्म उजळ माथ्याने हिंडला असता. या सर्व गोष्टींचा नीट विचार केल्यास धर्माच्या ऱ्हासाचे खरे कारण धर्माच्या दृष्ट फलाची उपेक्षा हेच होय हे पूर्णपणे लक्षात येईल.' ( धर्मस्वरूप निर्णय, पृ. २३२ )
 मीमांसकांची समन्वयपद्धती, त्यांचा अदृष्टवाद आणि त्यातून निर्माण झालेले