पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६९
धार्मिक जीवन
 

स्वभावाचे असूनही नीतिदृष्ट्या शुद्ध आहेत. ते कोणाची वस्तू अन्यायाने घेत नाहीत, व न्यायाने द्यावे लागते त्याहून अधिकच देतात. पापाचे प्रायश्चित्त अन्य जन्मी भोगले पाहिजे अशी त्यांची खात्री असल्यामुळे ते पापाला भितात व या जन्मी नीतीने वागण्याचा प्रयत्न करतात.'
 महाभारत, स्मृती व पुराणे यांनी हा जो बुद्धिप्रामाण्यवादी, प्रवृत्तिप्रधान, नीतिनिष्ठ दृष्टफलार्थी व समाजोत्कर्षकारक धर्म सांगितला त्यामुळे वैदिक धर्मावरील हिंदूंची निष्ठा दृढ झाली व बौद्ध व जैन या पंथांनी त्याच्यावर जे प्रखर हल्ले चढविले होते त्यापासून त्याचे रक्षण झाले. कालांतराने बौद्ध धर्म भारतात नामशेष झाला व जैन धर्माचे आक्रमक धोरण संपुष्टात आले. याच कालखंडात भारतावर यवन, शक, कुशाण, हूण यांची सतत आक्रमणे होत होती. पण वरील तेजस्वी धर्माच्या प्रभावामुळे त्या आक्रमणांचे निर्दाळण करून अंती त्या जमातींनाच आत्मसात करून टाकण्यात हिंदुसमाजाला यश आले. अशा या धर्माची परंपरा साधारणपणे दहाव्या शतकापर्यंत चालू होती. पुढे या धर्मातील महातत्त्वांचा लोप झाला. त्याला अत्यंत विकृत रूप प्राप्त झाले आणि हिंदुसमाजाचा ऱ्हास होऊन एकंदर भारताला आणि थोड्या कालावधीने महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या नरकात पिचत पडावे लागले. या धर्माच्या ऱ्हासाचे स्वरूप काय ते पाहून त्याची आता मीमांसा करावयाची आहे.

कुमारिल - शब्दप्रामाण्य
 वर एके ठिकाणी सांगितले आहे की इ सनाच्या आठव्या शतकाच्या अखेरीस नव्या स्मृती होण्याचे बंद झाले व तेथून पुढे निबंधकारांचे म्हणजे जुन्या ग्रंथावर टीका लिहिणाऱ्या धर्मशास्त्रज्ञांचे युग सुरू झाले. स्मृती रचनाबंद झाली याचाच अर्थ बुद्धिप्रामाण्य व देशकाल परिस्थितीनुरूप धर्मनियम सांगण्याचे धोरण नष्ट झाले असा होतो. असा धर्म नेहमीच जड, आंधळा व त्यामुळे समाजाचे धारण करण्यास असमर्थ असतो. हिंदुधर्माला आठव्या शतकानंतर असे जडमूढ रूप आले व तेथपासून समाजाच्या अपकर्षाचे विष बीज पेरले गेले. या शतकात स्मृतिरचना बंद का झाली आणि पुढील सर्व धर्मशास्त्रज्ञ शब्दप्रामाण्यवादी, परिवर्तन विरोधी आणि अदृष्टवादी का झाले हे पाहू लागताच एक फार प्रबळ असे कारण आपल्या ध्यानात येते. ते म्हणजे कुमारिलभट्टाने प्रवर्तित केलेला मीमांसापंथ व त्यातून निर्माण झालेली समन्वयपद्धती हे होय. कुमारिलभट्ट हा इ. सनाच्या आठव्या शतकात होऊन गेला. वेदप्रणीत कर्ममार्गाचे म्हणजे यज्ञयाग प्रधान धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा फार मोठा प्रयत्न त्याने केला. पण त्याला फारसे यश आले नाही. पण त्याने पुरस्कारिलेले शब्दप्रामाण्याचे तत्त्व, त्याचा अदृष्टवाद आणि विशेषतः त्याची समन्वयपद्धती यांनी मात्र हळूहळू धर्मशास्त्रज्ञांच्या मनाची पकड घेतली. ती इतकी की ब्रिटिशांच्या काळापर्यंत ती पूर्णपणे ढिली झालीच नाही. हिंदुसमाजाच्या