पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१६८
 

यांची परंपराही पुराणांनी चालविली होती. पुराणे वेदापेक्षा श्रेष्ठ होत हे सांगणाऱ्यांची मने कणखर असली पाहिजेत हे उघड आहे. वायुपुराणात इन्द्राच्या यज्ञाची गोष्ट आहे. यात पशुहिंसेची वेळ आली तेव्हा ऋषिमुनींनी तिला विरोध केला. वास्तविक यज्ञातील पशुहिंसा ही वेदमान्य आहे. पण महर्षींनी, 'हा धर्म नसून अधर्म आहे' असे स्पष्टपणे सांगितले. पुढे हे प्रकरण वसूकडे गेले. त्याने, पशुहिंसा केली तरी चालेल, असे उत्तर दिले. त्यावर पुराणकार म्हणतो, ' वसूने वेदशास्त्राप्रमाणे निर्णय दिला हे खरे, पण तसे करताना त्याने बलाबलाचा विचार मुळीच केला नाही.' ( वायु ५७ ) याचा अर्थ असा की वेदशास्त्राचा निर्णयही परिस्थितीचा विचार करून अग्राह्य ठरविला पाहिजे असे पुराणकारांचे मत होते. पुरुषबुद्धीचे महत्त्व ते हेच. या बुद्धीचा आश्रय करूनच 'प्रत्येक मन्वंतराच्या वेळी निराळी श्रुती केली जाते, मन्वंतराच्या वेळी सप्तर्षी, मनू व इतर सज्जन तथ्याला धरून धर्म सांगतात, प्रत्येक मन्वंतराच्या वेळी सप्तर्षी धर्मव्यवस्था करून परमपदाला जातात' असे वायु ५९, मत्स्य १४५ इ. पुराणांनी सांगितलेले आहे. दर मन्वंतरात नवी श्रुती रचावयाची असते व सप्तर्षी तिची रचना करतात, हे दोन विचार समाज प्रगतीचा अत्यंत पोषक असे आहेत. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने एकदाच सर्व श्रुतींची रचना करून ठेविली असून त्या श्रुतीत बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही हा विचारप्रवाह प्रबळ झाला की समाजाचा अधःपात होतो. पुराणांच्या प्रारंभकाळी तरी तो तसा नव्हता, वेदशास्त्राचे निर्णय आंधळेपणाने स्वीकारणे उचित नाही, असे सांगण्याइतका निर्भयपणा त्या काळच्या धर्मशास्त्रज्ञांच्या ठायी होता, असे वरील वचनांवरून दिसून येईल.

नीतितत्त्वे
 गीता, महाभारत, रामायण यांतील भक्तिमार्ग, व भक्तिमार्गातील समता यांचा जसा पुराणांनी समाजाच्या सर्व थरांत प्रसार केला तसाच त्यांतील नीतितत्त्वांचाही केला. कथारूपाने धर्मतत्त्व सांगण्याची पुराणांची पद्धत असल्यामुळे त्यांच्या कार्याला यशही चांगले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, दान, क्षमा, मनोनिग्रह, औदार्य, भूतदया, धैर्य, अद्रोह हीच खरी सनातन धर्माची लक्षणे ( सनातनस्य धर्मस्य मूलमेतद् ) असे वामन, पद्म, ब्रह्मांड, मत्स्य यांनी वारंवार सांगितलेले आहे. वेदाध्ययन, यज्ञ, तप इ. मार्गांनी मोक्ष मिळणार नाही, पण जो मनुष्य प्राणिमात्राकडे आत्मौपम्यबुद्धीने पाहतो त्याला निश्चित मिळेल, सहस्र अश्वमेधांपेक्षा सत्य श्रेष्ठ होय, अशा तऱ्हेची वचने पुराणांत सर्वत्र विखुरलेली आहेत. मानवाच्या मनोगुणांचा विकास नीतिधर्माने होतो, म्हणून कर्मकांडापेक्षा, आचारधर्मापेक्षा नीतिधर्म श्रेष्ठ होय, हे तत्त्व सर्व धर्मांना सारखेच मान्य आहे. पुराणांनी ही नीतितत्त्वे हिंदुसमाजात दृढमूल करून टाकण्यात मोठेच यश मिळविले होते. ह्युएनत्संगासारख्या परकी प्रवाशांनी तत्कालीन हिंदूच्या तनीतिमची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. तो म्हणतो, 'हे उतावळ्या व अनिश्चित