पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६७
धार्मिक जीवन
 

लोकसेवेवाचून परलोक-प्राप्ती होत नाही असा पुराणांचा सिद्धान्त आहे. इष्टापूर्त हा जुना शब्द आहे. इष्ट म्हणजे अग्निहोत्र, तप, सत्य, स्वाध्याय, आतिथ्य, वैश्वदेव हे होय. आणि विहिरी, तळी बांधणे, देवळे बांधणे, धर्मशाळा, गोशाळा, वेदशाळा, मठ बांधून देणे, वड, पिंपळ, आंबा, लिंबू, जांभूळ ही झाडे लावणे, गरिबांच्यासाठी झोपड्या बांधणे, विविध फुलांनी सुशोभित अशी उद्याने, कमळांची सरोवरे तयार करणे हा पूर्तधर्म होय. पद्मपुराण यालाच धर्मकार्य म्हणते. या पूर्तधर्माचा उपदेश करून, पुराणांनी, स्वर्गलोकात वा ब्रह्मलोकात जे सुख नाही ते परोपकाराने मिळते, दयाधर्मावाचून यज्ञ, तप यांचा उपयोग नाही हे विशद करण्यासाठी अनेक कथा रचल्या व त्यांतील ऋषी, मुनी, राजर्षी यांच्या ताेंडी ती वचने घालून दिली. दानाचे महत्त्व सांगताना पुराणांनी हीच समाजसेवेची दृष्टी ठेविली होती. उपनिषदे, स्मृती यांनी, जो स्वतःसाठीच अन्न शिजवितो तो पापच भक्षण करतो, असे सांगितल्याचे प्रसिद्धच आहे. पुराणांनी नाना प्रकारांनी हा दानधर्म विशद करून सांगितला आहे. पद्मपुराण म्हणते, 'जो नित्य पंगू, अंध, बाल, वृद्ध, रुग्ण, दीन, अनाथ यांना अन्न दान करतो त्याला स्वर्गसुख प्राप्त होते. '

सर्वांचा धर्म
 पुराणांचा दुसरा विशेष म्हणजे त्यांनी हा पुराण-धर्म ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांना सारखाच सेव्य आहे, विहित आहे, आचरणीय आहे असे आग्रहाने सांगून सर्व समाजाला काहीसे एकरूप देण्याचा प्रयत्न केला. वेदप्रणीत श्रौत धर्माचा व पुढील स्मार्त धर्माचा अधिकार स्त्रियांना नव्हता व शूद्रांनाही नव्हता. पण पुराणधर्माचा अधिकार मात्र सर्व वर्णाना व सर्व जातींना, स्त्रियांना, पुरुषांना सारखाच आहे. गीताप्रणीत कर्मयोगाचा जसा पुराणांनी पुरस्कार केला तसाच त्यातील भक्तिमार्गाचाही केला. पण त्याला व्रते, तीर्थयात्रा, स्नाने व समाजसेवा यांची जोड देऊन त्यांनी धर्म अत्यंत सुलभ करून टाकला. म्हणूनच सर्व जातिवर्णीत त्याचा झपाट्याने प्रसार झाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना शालिग्राम पूजेचा अधिकार आहे ( स्कंद ). स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्वांना शालिग्राम-पूजेने मोक्षलाभ होईल (पद्म). सांख्य, योग, स्वाध्याय, तप, यज्ञयाग यांनी मी प्रसन्न होत नाही तर एका भक्तीने संतुष्ट होतो; किरात, हूण, पुलिंद, यवन, पुल्कस, अभीर, खस हे सुद्धा विष्णूची भक्ती करून तरून जातात ( भागवत ). हा धार्मिक समभाव पुराणे आग्रहाने सांगताना दिसतात. एकादशी, शिवरात्र ही व्रते, तीर्थयात्रा, तुलसीपूजा, प्रदक्षिणा, गोपूजा, दीपपूजा, यांचा पुराणांनी सर्व वर्णाना अधिकार दिला आहे.

निर्भय निर्णय
 बुद्धिप्रामाण्य व तदनुषंगाने येणारे धर्मपरिवर्तनाचे तत्त्व यांची महाभारत व स्मृती