पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१६६
 

बहुतेक संशोधक मानतात. सध्याचा हिंदुधर्म हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्म आहे. त्या वरूनही प्रथम श्रुती, मग स्मृती आणि नंतर पुराणे हाच कालक्रम दिसून येतो. पण पुराणांची रचना चौथ्या शतकात झाली याचा अर्थ इतकाच की सध्याच्या स्वरूपातली रचना त्या वेळी झाली. मूळ पुराणे फार प्राचीन आहेत. ब्रह्मदेवाने वेदांच्याही आधी पुराणे रचली, वेद हे पुराणांवर अवलंबून आहेत असे पुराणांतच अनेक ठिकाणी सांगितले आहे. हरिश्चंद्र, नलदमयंती, सावित्री यांच्या कथा प्राचीन कथा, म्हणून महाभारतातही सांगितलेले आढळते. त्यावरून अत्यंत प्राचीन काळी लोककथांच्या रूपाने पुराणे अस्तित्वात असावी हा संशोधकांचा तर्क संयुक्तिक वाटतो. असे असल्यामुळे पुराणांचे महत्व वेदांपेक्षाही जास्त आहे, असे सांगण्यास पुराणकार कचरत नाहीत. वेद, षडंगे, उपनिषदे इतके पढूनही खरे ज्ञान होणार नाही, त्यासाठी पुराणांचा अभ्यास अवश्य आहे (वायु), पुराणे व इतिहास वेदांपेक्षाही श्रेष्ठ होत (कूर्म), असे ते निर्भयपणे सांगतात. वेदांसंबंधी अत्यंत पूज्यबुद्धी ठेवूनही पुराणे आपले महत्त्व अशा रीतीने सांगतात हे विशेष होय. अशा या पुराणांची रचना इ. सनाच्या चौथ्या शतकापासून दहाव्या अकराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात झाली. आणि तेव्हापासून श्रौत व स्मार्त धर्माचा प्रभाव कमी होऊन पुराणोक्त धर्माचेच अधिराज्य हिंदुसमाजावर प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला. श्रौत व स्मार्त धर्माचा भारतात त्यानंतर समूळ लोप झाला असे नव्हे. वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संपूर्णपणे उच्छेद असा कोणत्याच संप्रदायाचा भारतात झाला नाही. म्हणूनच नंतरच्या काळात हिंदुधर्म हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे असेच धर्मशास्त्र सांगत आले आहे. लोकमानसावर प्रभाव कोणत्या धर्माचा जास्त झाला एवढेच येथे सांगावयाचे आहे.

लोकसंग्रह
 पुराणांचा पहिला विशेष हा की त्यांनी गीतेतील कर्मयोगाचा, लोकसंग्रहाचा म्हणजेच समाजसेवेचा अतिशय विस्ताराने व हिरीरीने प्रचार केला. अनेक पुराणांनी हा उपदेश करण्यासाठी गीतेतले श्लोक किंवा त्यांचा सारार्थ दिला आहे. यतः प्रवृत्तिः भूतानां, येन सर्वमिदं ततम् । स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदति मानवः । या गीतावचनाचे व्याख्यानच विष्णू, अग्नी, पद्म इ. पुराणांनी केले आहे. कूर्म पुराण म्हणते, 'मनुष्याने फलाची आशा सोडून सतत कर्म करावे, म्हणजे तो ज्ञानी नसला तरी कालांतराने त्याला मोक्ष मिळेल. मला अर्पण केलेल्या कर्मांचा बंध लागत नाही. उलट त्यांनी मोक्ष मिळतो.' मार्कंडेय पुराणाने हेच कर्मयोगशास्त्र सांगितले आहे. कर्मे कोणती करावी या प्रश्नाला, वर्णविहित कर्मे, हेच उत्तर आहे. पण पुराणांनी समाजधारणेकडे लक्ष देऊन समाजसेवेची अनेक कर्मे पुण्यप्रद म्हणून उपदेशिली आहेत. समाजसेवेला पुराणे पूर्तधर्म म्हणतात. त्यात दीनदलितांची सेवा, त्यांच्या दुःखांचा परिहार याला प्रमुख स्थान आहे. तप, यज्ञ कितीही आचरले तरी अशा