पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६३
धार्मिक जीवन
 


तीन ऋणे
 प्रवृत्तिपरतेच्या दृष्टीने पाहिले तरी हेच दिसेल. धर्मशास्त्र केवळ मोक्षैकनिष्ठ झाले. ते निवृत्तीचा, संन्यासाचा, संसारत्यागाचा उपदेश करू लागले की समाजाचा नाश होतो. महाभारत आणि स्मृती यांत तीन ऋणांची जी कल्पना आहे ती निवृत्तीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याने ऋषी, देव व पितर यांचे ऋण फेडलेच पाहिजे, असा या धर्मशास्त्राचा कटाक्ष होता. मुलांना व्यवसाय लावून दिल्यानंतर आणि मुलींना सुस्थळी दिल्यानंतर मगच गृहस्थाने संन्यासाचा विचार करावा, असे महाभारत सांगते; तर नातू झाला, अंगाला सुरकुत्या पडल्या म्हणजे मग अरण्याचा आश्रय करावा असे मनू म्हणतो ( ६. २ ) सूत्रवाङ्मय हे महाभारताच्या आधीचे. श्रौत यज्ञधर्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते निर्माण झालेले. त्यात गृहस्थाश्रमाची महती गाऊन तीन ऋणे फेडली पाहिजेत हे तर आग्रहाने सांगितले आहेच, पण शिवाय ब्रह्मचर्य किंवा संन्यास यांची प्रशंसा करणारे लोक धुळीस मिळतात असेही म्हटले आहे (बौधायन २. ६. ११.३३ व ३४, आपस्तंब २. ९. २४.८ ). याज्ञवल्क्यानेही मनूप्रमाणेच गृहस्थाश्रमाची महती गायिली आहे. हारीतस्मृती, वृद्धात्रेयस्मृती, योग वासिष्ठ या ग्रंथांतही मनूने प्रतिपादिलेल्या वैदिक कर्मयोगाचीच महती गायिली आहे. यावरून हे स्पष्ट दिसेल की महाभारत व स्मृती हे ग्रंथ प्रवृत्तिधर्माचे, कर्मयोगाचे पुरस्कर्ते असून निवृत्ती ही समाजघातक आहे असे त्यांचे मत होते.

पुरुषबुद्धी
 धर्मशास्त्रात पुरुषबुद्धीला अवसर असणे हे श्रेष्ठ, समाजोत्कर्षकारक धर्माचे तिसरे लक्षण होय. शब्दप्रामाण्य किंवा वचनप्रामाण्य एकदा धर्मशास्त्रात शिरले की समाज आंधळा होतो आणि त्याचा अधःपात अटळ होऊन बसतो. वरील ग्रंथांवरून या काळाचे धर्मशास्त्र वचनप्रामाण्यवादी नव्हते असे दिसून येईल. 'हे अर्जुना, म्हणून विद्वान पुरुषाने या जगात बुद्धीचा अवलंब करून धर्माधर्माचा निश्चय करावा व त्याप्रमाणे वागावे ' (शांति, १४१, १०२ ) 'परिस्थिती व बलावल पाहूनच कोणताही निर्णय करावा' ( वन, २८-३२ ) ' राजाने आपल्या बुद्धीच्या योगाने धर्माचे त्या त्या बाजूने संशोधन केले पाहिजे, केवळ शास्त्राने किंवा केवळ बुद्धीने धर्मनिर्णय शक्य नाही' (शांति, १४२, १७ ) अशी अनेक वचने महाभारतात सापडतात. 'प्रत्यक्ष, अनुमान व विविध शास्त्रग्रंथ यांची धर्मशुद्धीसाठी आवश्यकता असते' असे मनू म्हणतो ( १२. १०५). चाणक्य तथा कौटिल्य हा साधारणपणे महाभारताचा समकालीन होय. त्याने 'धर्मन्याय व लिखित शास्त्रवचन यांत विरोध आल्यास न्यायच प्रमाण मानावा, लिखित वचन बाजूस सारावे,' असा अभिप्राय दिला आहे. 'शास्त्र आहे म्हणून त्यातील प्रत्येक गोष्ट करावी असे ठरत नाही. शास्त्रनियम व्यापक तत्त्वा-