पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१६४
 

वर आधारलेले असून आचरण मात्र त्या त्या परिस्थितीप्रमाणेच व्हावयाचे असते.' असे वात्स्यायनांचे मत आहे.

परिवर्तनीयता
 धर्मात पुरुषबुद्धीला अवसर देणारे धर्माची परिवर्तनीयता ओघानेच मान्य करतात. परिस्थिती सारखी बदलत असते, नव्या समस्या निर्माण होत असतात, अपूर्व प्रसंग निर्माण होत असतात. अशा वेळी देशकाल पाहून नवे धर्मशास्त्र, नव्या स्मृती रचल्या नाहीत तर समाज जुन्या चाकोरीतून रहाटत राहून सामर्थ्यहीन, दुबळा होऊन जातो, त्याची जीवशक्ती क्षीण होते. म्हणूनच युगमानाप्रमाणे धर्म बदलला पाहिजे असे मनूने म्हटले आहे ( १.८५ ) एकच गोष्ट परिस्थितीप्रमाणे धर्म किंवा अधर्मही ठरते. म्हणून धर्म परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो, असे भीष्मांनी सांगितले आहे (शांति, ३६.११ ) श्रीकृष्ण, व्यास यांसारख्या सर्व भारती धर्मवेत्त्यांनी धर्माविषयी असाच निश्चय सांगितला आहे. देशकाल, आपले बलाबल, द्रव्य, हे सर्व पाहून धर्मनिश्रय करावा असे बहुतेक सर्व स्मृती सांगतात. पुष्कळ वेळा स्मृतिकारांनी आधीच्या स्मृतिकारांची मते आपल्याला मान्य नाहीत, असे स्पष्टपणे सांगून आपले निराळे मत मांडल्याचे दिसून येते. द्विजातींनी शुद्रभार्या करावी हे मनूचे मत मला मान्य नाही, असे याज्ञवल्क्य म्हणतो (१.५६ ). नीतिविचार कालसापेक्ष कसा असतो, दरवेळी परिस्थिती पाहून तात्त्विक सिद्धान्ताला मुरड घालणे हेच श्रेयस्कर कसे असते, हे कर्मजिज्ञासा या गीतारहस्यातील प्रकरणात लो. टिळकांनी भीष्म, प्रल्हाद, नारद, मनू, याज्ञवल्क्य या प्राचीन धर्मशास्त्रज्ञांच्या वचनांच्या आधारे दाखवून दिले आहे.
 इ. पू. २५० पासून पुढच्या पाचसहाशे वर्षांच्या कालात समाजात रूढ असलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप काय होते ते येथवर सांगितले. त्यानंतर आता पुढील पाचसहाशे वर्षांच्या काळातील पुराणप्रणीत धर्माचे स्वरूप पहावयाचे आहे. पण या धर्मग्रंथांतील धर्मशास्त्राची चिकित्सा करताना जी एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी ती आधी सांगतो.

काल अनिश्चित
 महाभारत किंवा मनुयाज्ञवल्क्यादिकांच्या स्मृती यांचा काळ निश्चित ठरलेला नाही, ठरविता येत नाही. त्यांचा काळ सांगताना शतकांच्या भाषेत बोलावे लागते. आणि पुष्कळ वेळा भिन्न पंडितांच्या मतांत ४/५ शतकांचा फरक असतो. त्यामुळे अमुक परिस्थिती व अमके धर्मशास्त्र असे निश्चयाने कोणत्याच ग्रंथाबद्दल बोलता येत नाही व त्यातील कार्यकारणसंबंध निश्चित करता येत नाही. पण यापेक्षाही जास्त दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यांपैकी प्रत्येक ग्रंथात नंतरच्या पंडितांनी, धर्मशास्त्रवेत्यांनी वाटेल तसे प्रक्षेप केले आहेत. महाभारत, मनु याज्ञवल्क्यांच्या स्मृती, अष्टादश