पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१६२
 

पूर्ण विस्मृत झाला असे नाही. बौद्ध व जैन हे अगदी अवैदिक धर्मपंथ. पण त्यांच्या संस्थापकांचा व त्यांच्या धर्मतत्त्वांचाही समावेश वैदिक सनातन धर्मात करून घेण्याचीच पुराणकारांनी वृत्ती जोपासली. त्यामुळे कोणत्याही कालखंडातील धार्मिक जीवनाचा अभ्यास करताना त्याचे धागेदोरे मागल्या सर्व कालखंडांतील धार्मिक ग्रंथांत, संप्रदायांत व पंथांत गुंतलेले आहेत हे ध्यानात ठेवावे लागते.
 तत्कालीन धर्मशास्त्राच्या व लोकांच्या या प्रवृत्ती ध्यानात घेऊन सातवाहन ते यादव या कालखंडातील महाराष्ट्रीय लोक कोणत्या धर्मशास्त्राचे अनुसरण करीत होते ते आता पाहावयाचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे या कालखंडातले मुख्य धर्मशास्त्रीय ग्रंथ म्हणजे महाभारत, स्मृती व पुराणे हे होत. यांपैकी महाभारत व स्मृती यांतील धर्मशास्त्र प्रथम पाहू आणि नंतर पुराणांचा विचार करू. इ. स. पूर्व २५० ते इ. स. ३०० या काळात महाभारत, मनुस्मृती व याज्ञवल्क्यस्मृती यांचे सर्वत्र वर्चस्व होते. त्यानंतर तीन चार शतके स्मृतिरचना होत राहिली. पण त्या काळात पुराण-धर्माचा प्रभाव फार पडू लागला होता. म्हणून महाभारत व स्मृती यांचा प्रथम विचार करून नंतर पुराणांचा करणे युक्त टरेल.

ऐहिक उत्कर्ष
 महाभारत व स्मृती यांचे धर्मशास्त्र समाजाचा ऐहिक उत्कर्ष दृष्टीपुढे ठेवून सांगितलेले आहे. धर्म हा केवळ मोक्षासाठी व परलोकासाठी असून त्याची फळे अदृष्ट असतात, त्याच्या यशापयशाची कसोटी इहलोकातील फळावरून ठरवावयाची नसते हा मीमांसा-पंथाचा सिद्धान्त या काळात प्रचलित झालेला नव्हता. धर्माचे आचरण का करावे हे सांगताना त्यापासून अर्थ व काम प्राप्त होतात म्हणून, असे व्यासांनी कारण दिले आहे. धर्मनियम हे लोकांच्या प्रभावासाठी, उत्कर्षासाठी केलेले असतात असे श्रीकृष्ण म्हणतात. ज्याच्या योगाने लोकांचे धारण होईल तो धर्म, असे भीष्म सांगतात. सत्याची व्याख्याही महाभारतात 'जे सर्वभूतांचे हित करते ने सत्य' अशीच दिली आहे. तेव्हा धर्म हे समाजाच्या उत्कर्षाचे साधन आहे, इहनिरपेक्ष अशी ती कल्पना नाही, याविषयी महाभारतातील धर्मवेत्यांना संदेह नव्हता. जे कृत्य, जो आचार अनेकांना घातक होतो तो धर्म नसून कुमार्ग होय, जे कृत्य समाजाशी, त्याच्या कल्याणाशी अविरोधी असेल तेच धर्म होऊ शकते, हा विचार महाभारतात ठायी ठायी आलेला आहे.
 मनुयाज्ञवल्क्यांचेही हेच मत होते. जो धर्म असुखोदर्क व लोकविक्रुष्ट असेल, ज्यामुळे सुखलाभ होत नाही व जो लोकविरोधी आहे, तो त्याज्य मानावा, असे मनूने म्हटले आहे ( ४. १७६ ) आणि अस्वर्ग्य व लोकविद्विष्ट धर्माचे आचारण करू नये, असे याज्ञवल्क्यांचे मत आहे ( १. १५६ ).