पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६१
धार्मिक जीवन
 


परिवर्तने
 हिंदूंचे धार्मिक जीवन पाहताना दुसरी एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे, ती ही की वेदकाळापासून आजपर्यंत हिंदुधर्मात अनेक परिवर्तने झाली असली तरी, आधीच्या काळातील धर्मसिद्धान्त, धर्मतत्त्वे किंवा धर्माचार संपूर्णपणे नष्ट होऊन पुढच्या काळात सर्वस्वी नवीन धर्म प्रवृत्त झाला, असे कधीही घडलेले नाही. वेदकाळचा धर्म यज्ञयागप्रधान होता, प्रवृत्तिप्रधान होता. ते लोक विजिगीपू असून भौतिक धन, स्वराज्य, साम्राज्य यांविषयी त्यांना मोठ्या आकांक्षा होत्या. पुढे ब्राह्मण काळात यज्ञधर्माला फारच जडरूप आले. तेव्हा ज्ञानप्रधान असा उपनिषद्धर्म उदयास आला. त्याने यज्ञप्रधान कर्मकांडाचा निषेध केला व मोक्षप्राप्ती हे ध्येय सांगून क्षणभंगुर मायामय संसाराचा त्यासाठी त्याग करणेच अवश्य आहे असा सिद्धान्त सांगितला. वेदांचा कर्ममार्ग मागे पडून अशा रीतीने ज्ञानमार्ग रूढ झाला. पण हा संन्यासप्रधान ज्ञानमार्ग राष्ट्रीय प्रपंचाला हानिकारक आहे आणि आचरावयास अवघड आहे, हे ध्यानी घेऊन श्रीकृष्णांनी भक्तिप्रधान कर्मयोग प्रस्थापित केला. महाभारताची सध्याच्या स्वरूपातील रचना जरी इ. पू. दुसऱ्या तिसऱ्या शतकात झाली असली तरी त्यातील इतिहास इ. पू. पंधराव्या चौदाव्या शतकात घडलेला आहे. त्याच काळात व्यास, नारद, वसिष्ठ इ ऋषींनी व विशेषकरून श्रीकृष्णांनी या भक्तिप्रधान कर्मयोगाची स्थापना केली असे लो. टिळकांचे मत आहे ( गीतारहस्य परिशिष्ट भाग ४ था ). यानंतरच्या काळात श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे हे वाङ्मय निर्माण करून पुन्हा यज्ञधर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न वैदिकांनी केला. आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून बौद्ध व जैन हे धर्म उदयास आले. दोन तीन शतकांनी अशोकाच्या प्रयत्नाने सर्व भारतभर त्यांचा प्रसार होऊ लागला. तेव्हा प्रारंभी सांगितल्याप्रमाणे सौती नावाच्या पंडिताने महाभारताची रचना केली. आणि त्यानंतरच्या दहाबारा शतकांत वर सांगितल्याप्रमाणे स्मृती, पुराणे व निबंध या ग्रंथांची रचना झाली. या प्रदीर्घ कालखंडात वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, षड्दर्शने, स्मृती, पुराणे, निबंध इ. जे धर्मग्रंथ झाले त्यांत अनेक तात्त्विक सिद्धांत, अनेक नीतितत्त्वे, अनेक समाजरचनेची तत्त्वे, अनेक धर्माचार अगदी परस्परविरुद्ध आहेत. त्यांच्यांतील विरोध अगदी मूलगामी असा आहे. तरीही पूर्वीच्या काळचे धर्मग्रंथ किंवा त्यांतील धर्मसिद्धान्त पुढील काळच्या धर्मशास्त्रज्ञांनी व जनतेने सर्वस्वी निंद्य मानून त्यांचा समूळ त्यागच केला पाहिजे, तो पूर्वधर्म उच्छिन्न झाला पाहिजे असा आग्रह कधीच धरला नाही. त्यामुळे वेद, उपनिषदे, गीता, स्मृती, पुराणे यांपैकी प्रत्येक धर्मग्रंथातील काही ना काही तत्त्व किंवा आचार प्रत्येक कालखंडातील रूढ धर्मात समाविष्ट झालेला आढळून येतोच. यज्ञयाग मागे पडून मूर्तिपूजा रूढ झाली तरी यज्ञसंस्था समूळ नष्ट झाली असे कधी घडले नाही. भक्तिमार्ग रूढ झाला म्हणून ज्ञानमार्ग