पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५५
धार्मिक जीवन
 


महाभारताचे कार्य
 महाराष्ट्रात अशोकानंतर लगेच वैदिक धर्माचे हे पुनरुज्जीवन झाले, त्याच्या मागे महाभारत ही महाप्रेरणा असावी, असे पंडितांचे मत आहे. सनातन वैदिक धर्मावर आलेल्या त्या महान आपत्तीचे निवारण करण्यासाठीच महाभारताची रचना झाली, असे कुलगुरू चि. वि. वैद्य यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रारंभीच सांगितले आहे. याच सुमारास शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य असे अनेक पंथ निर्माण होऊन त्यांच्या उपासकांत शत्रुभाव निर्माण झाला होता. सांख्य, वेदान्त हे तत्त्वज्ञानाचे जे पंथ त्यांच्यांतही संघर्ष होता. अशा वेळी या सर्व पंथांच्या मतांचा समन्वय साधून भारतीय समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे कार्य महाभारताने केले. वैद्य म्हणतात, 'अशा वेळी सौतीने भारताला महाभारताचे प्रचंड स्वरूप देऊन सनातन धर्मातील अन्तःस्थ विरोध काढून टाकून, सर्व मतांचा एके ठिकाणी मेळ बसवून सर्व प्राचीन कथांचा एके ठिकाणी संग्रह करून, सनातन धर्माचे उदात्त रूप लोकांच्या मनावर ठसवून सनातनधर्मीयांना जोर आणण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. ( उपसंहार, प्र. २२ ) महाभारताने आणखीही एक थोर कार्य केले आहे. ते म्हणजे कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना हे होय. वर सांगितलेच आहे की बौद्ध, जैन है वेदबाह्य पंथच नव्हे, तर वैदिक धर्मातील बहुतेक दर्शनेही निवृत्तिवादी असून संसारत्यागाचा उपदेश ती करीत असत. कर्मत्यागावाचून मोक्ष नाही, असा त्यांचा दृढ सिद्धान्त होता. या मताचा उच्छेद करून, श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून कर्मयोगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. स्वधर्माने, न्यायाने निष्काम बुद्धीने म्हणजे फलत्यागबुद्धीने कर्म करणे हाही मोक्षाचा निश्चित मार्ग आहे, असा गीतेचा सिद्धान्त आहे. वैद्य म्हणतात, 'धर्मयुक्त निष्काम कर्माचरणाचा मार्ग नुसत्या भगवद्गीतेतच सांगितला आहे असे नाही, तर सबंध महाभारतात अथपासून इतिपर्यत उपदेशिला आहे. महाभारत व रामायण ही दोन्ही आर्ष महाकाव्ये याच उपदेशाकरिता अवतीर्ण झाली आहेत, कर्मयोगाचे महत्त्व मनावर ठसविण्याकरिताच या राष्ट्रीय ग्रंथांचा जन्म आहे.' ( उपसंहार, पृ. ७५४ )

ग्रामीण भागातही
 गाथा सप्तशती हा सातवाहनकालीन ग्रंथ. त्यात त्या काळच्या ग्रामीण महाराष्ट्राचे वर्णन आहे. त्यावरून हा ग्रामीण समाज वैदिक परंपरेतच स्थिर झाला होता असे दिसते. शिवाला आरंभीच्या व शेवटच्या गाथेत वंदन आहे. अनेक गाथांतून हरी, कृष्ण, गणपती, सूर्य यांचे स्तवन वा निर्देश आहेत. राम, लक्ष्मण यांचाही उल्लेख एका ठिकाणी आहे. या देवतांच्या सध्या रूढ असलेल्या कथाही त्या काळी रूढ होत्या असे दिसते. यावरून वैदिक यज्ञधर्म जाऊन त्या जागी आलेला भागवत धर्म