पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१५६
 

सगळ्या महाराष्ट्रात प्रसृत झाला होता असे दिसते. या ग्रंथात जैनांचा उल्लेख मुळीच नाही; व बौद्धांचाही क्वचितच येतो. तेव्हा सातवाहनांच्या काळातच महाराष्ट्र हा रामायण-महाभारताच्या संस्कृतीत स्थिरावला होता असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.

वाकाटक शिवोपासक
 सातवाहनानंतर आलेले वाकाटकांचे घराणे वैदिक परंपरेचेच अभिमानी होते. त्यांचा मूळ पुरुष गृहपती वाकाटक हा बौद्धमतानुयायी होता. पण पुढे त्याच्या वंशजांचे धर्मपरिवर्तन होऊन ते वैदिक व पौराणिक धर्माचे एकनिष्ठ अनुयायी बनले असे म. म. मिराशी म्हणतात. मूळ राज्य-संस्थापक विन्ध्यशक्ती याने अनेक यज्ञयाग केले होते. त्याचा पुत्र प्रवरसेन याने चार अश्वमेध व सातही सोमयाग केले. नंतरच्या वाकाटक नृपतींनी स्वतः श्रौत याग केल्याचा उल्लेख नाही. पण त्यांनी विज्ञान ब्राह्मणांना ते याग करण्यासाठी भरपूर दाने वारंवार दिल्याचे उल्लेख त्यांच्या ताम्रपटांत आहेत. पण यज्ञयाग हे या काळी नैमित्तिक होते. नित्याच्या जीवनात वर्चस्व पौराणिक धर्माचेच होते. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते. त्यांनी अनेक शिवमंदिरेही बांधली होती. द्वितीय रुद्रसेनाची महाराणी प्रभावती गुप्ता ही रामभक्त होती. रामगिरीवरील राममंदिरात ती नित्य दर्शनास जात असे. पवनार जवळ धाम नदीच्या तीरावर तिच्या पुत्राने आणखी एक राममंदिर बांधले होते. वाकाटकांच्या दानलेखांवरून त्यांनी अनेक दाने एकादशीच्या दिवशी दिल्याचे दिसते. तेव्हा एकादशीव्रताला त्या वेळीच महत्त्व आलेले होते असे दिसते. इ. स. २५० ते ५५० हा वाकाटकांचा जो काळ तोच पुराणांच्या रचनेचा काळ मानला जातो. तेव्हा पौराणिक धर्माचा - त्यातील शिवविष्णूंचे ऐक्य, व्रतमाहात्म्य यांचा- प्रभाव तेव्हा जनमनावर असावा हे साहजिकच आहे.

चालुक्य मंदिरे
 चालुक्यराज मंगलीश याच्या एका शिलालेखात चालुक्य सम्राटांच्या धर्मनिष्ठेचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. 'या कुळातील पुरुषांनी अग्निष्टोम, वाजपेय, पौण्डरिक, अश्वमेध इ. यज्ञ केले होते. राजा मंगलीश याने बदामीच्या लेण्यात श्रीविष्णूचे अद्भुत मंदिर कोरविले आणि तेथे विष्णुप्रतिमेची स्थापना केली. त्याने निविम्न लिंगेश्वर नावाचा गाव नारायणबलीसाठी सोळा ब्राह्मणांना संन्याशांच्या भोजनाकरिता दान दिला. बदामी हे त्या वेळी विद्येचे आगर होते. तेथे चौदा विद्यांत निष्णात असे सहस्रावधी ब्राह्मण राहात असत. विष्णुमंदिराप्रमाणेच चालुक्यांनी शिवमंदिरेही बांधली होती. विक्रामादित्याच्या दोन राण्या लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी यांनी लोकेश्वर व त्रिलोकेश्वर यांची देवळे बांधली होती.