पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४७
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 


हिंदुधर्मशास्त्राचा प्रभाव
 लोकायत्त संस्थांचा विकास व्हावयाचा तर व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वांना मान्यता मिळणे अवश्य असते. ती जेथे मिळते तेथल्या व्यक्ती कणखर, तेजस्वी व्यक्तित्वाने संपन्न अशा असतात. कर्तव्यबुद्धी व स्वतःच्या हक्कांची जाणीव यांचा समतोल त्यांच्या ठायी साधलेला असतो. आणि अशा व्यक्ती, असे लोक ज्या प्रदेशात असतात तेथेच समर्थ लोकसंघटना शक्य होतात. हा विचार येथवर मांडला. हिंदुधर्मशास्त्रात प्रारंभीच्या काळी व्यक्तित्वपोषक अशी बरीच तत्त्वे होती. पण त्याच वेळेपासून व्यक्तित्वाला घातक अशा तत्त्वांची बीजेही येथे प्रादुर्भूत झाली होती. वर सांगितलेले हिंदूचे अत्यंत विषम, समाजघातक, विघटक असे जे धर्मशास्त्र त्याचे प्रतिपादन प्रारंभीच्या काळापासून होत असले तरी त्या काळी त्याचा तितकासा प्रभाव पडत नव्हता. उत्तरकाळात लोकमानसात ते हळूहळू दृढमूल होऊ लागले आणि इ. सनाच्या अकराच्या बाराव्या शतकात त्याचा प्रभाव पूर्ण होऊन जुने व्यक्तिपोषक शास्त्र लोपले. त्यामुळे मनुष्यांच्या ठायीचे व्यक्तित्व लोपले आणि त्याबरोबर येथल्या स्वायत्त संस्था निस्तेज होऊन लोकसंघटना दुबळ्या झाल्या आणि समाज परकी आक्रमणास बळी पडला. हे कसे घडत गेले व का घडत गेले याविषयी इतिहास- पंडितांनी केलेले विवेचन थोडक्यात देऊन या प्रतिपादनाचा समारोप करू.

देश राजाचा !
 'मध्ययुगीन भारत' या आपल्या ग्रंथात हिंदूंच्या ऱ्हासाची मीमांसा करताना चिंतामणराव वैद्य म्हणतात, 'स्वहिताचा संबंध राष्ट्रहिताशी आहे ही जाणीव पाश्चात्य देशात दिसते तशी प्राचीन काळी येथे अल्पप्रमाणात होती. त्या काळी राज्य जनतेचे आहे अशी कल्पना असे. पुढे पुढे राज्य राजाचे आहे, त्याला ते पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे प्राप्त झाले आहे, असा विचारप्रवाह रूढ होऊन वरील जाणीव लोपली. प्रत्येक प्रजाजन राष्ट्राचा घटकावयव आहे ही कल्पना भारतात दृढमूल झाली नाही. त्यामुळे लोकांचा राजशासनाशी असलेला संबंध तुटला आणि त्यामुळे येथे राष्ट्रनिष्ठेचा परिपोष झाला नाही. जी काही थोडीशी अशी निष्ठा होती ती बाराव्या शतकाच्या अखेरीस नष्ट झाली. हिंदू डांबून असे कधी युद्ध करीत नसत. कारण देश राजाचा आहे अशी त्यांच्या मनात कल्पना होती. येथे एक भाषा झाली, पण एकराष्ट्रीयत्व निर्माण झाले नाही. इ. स. १००० | १२०० या काळात ब्राह्मणक्षत्रियांची बुद्धिमत्ता राष्ट्रशास्त्रात काम करीतच नव्हती तर साहित्यशास्त्र, अलंकारशास्त्र यात ती मग्न झाली होती. गझनीच्या महंमदापुढे रजपूत राजे नामोहरम झाले त्याचे कारण असे की त्याच्या सैन्यात धर्माेत्साह जात होता. हिंदूत तो नव्हता. शिहाबुद्दिन घोरी यास येथील रईस व जमीनदार खुषीने शरण गेले; कारण घोरी व रजपूत राजे यांच्यांतील संघर्षाविषयी