पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१४६
 

मशिदीत अत्यंत खालच्या पातळीवरचा मुस्लीम हाही जाऊ शकतो. जे कुराण मौलवी वाचील, पढेल ते कुराण वाचण्याचा प्रत्येक मुसलमानाला हक्क आहे. यावरून व्यक्तीची काही किमान प्रतिष्ठा मुस्लिम समाज मान्य करतो हे यावरून स्पष्ट होते. किमान समताही त्यात मान्य केली जाते. हिंदुधर्मशास्त्रज्ञांनी ही दोन तत्त्वे हिंदुसमाजात कधीही येऊ द्यावयाची नाहीत अशी प्रतिज्ञा केलेली आहे. वेद हे हिंदुधर्मात वंद्य मानले जातात. पण ते पठण करण्याचा हक्क तीनचतुर्थांश समाजाला नाही. आणि शूद्र व अंत्यज त्यांना तर ते ऐकण्याचासुद्धा हक्क नाही. पुढच्या काळात शिवविष्णू, रामकृष्ण यांची भक्ती धर्मशास्त्रज्ञांनी सर्व वर्गाना सांगितली. पण देवळात जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा हक्क शूद्र, अस्पृश्य यांना नाही. यामुळे धर्म हे तत्त्वही हिंदु- समाजात लोकसंघटनेचे तत्त्व होऊ शकले नाही. स्त्रिया, वैश्य, शूद्र व अंत्यज यांच्या प्रतिष्ठेचा पदोपदी अवमान करण्यातच हिंदुधर्मशास्त्राला भूषण वाटते. 'माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य व शूद्र किंवा अंत्यजादी जे पापयोनी असतील ते देखील परमगती पावतात. मग जे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत त्यांची गोष्ट काय?' हा गीतेतला विचार मोठा उदार विचार म्हणून सांगितला जातो. पण व्यक्तित्व, मानवत्व, त्याची प्रतिष्ठा या दृष्टीने पाहता तो अत्यंत मानहानिकारक आहे. कारण स्त्रीशूद्रांना वैश्यांनाही वेदाधिकार नाही, म्हणून ही सोय केलेली आहे. तेव्हा हे सर्व वर्ग हीन होत, हे गृहीत धरूनच हा विचार सांगितलेला आहे. म्हणजे धर्म सांगतानासुद्धा गीतेने व्यक्तीला व्यक्ती म्हणून तो सांगितलेला नाही तर प्रथम तिची जात, तिचा वर्ण ध्यानात घेऊन तो सांगितलेला आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा गीतेलाही मान्य नाही ( गीता अत्यंत उदार आहे तरीही ) हे यावरून उघड आहे. अशा या गीतेसाठी प्राणार्पण करावे असे शूद्रांना, अंत्यजांना कधी तरी वाटेल काय ? काही उदात्त तत्त्वासाठी प्राणार्पण करावे हा ध्येयवाद समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ठायी बाणला तरच लोकसंघटना शक्य होऊन तो समाज समर्थ होतो. कारण असा ध्येयवाद हाच व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देतो. आणि मग ती संघटना व्यक्तींची होते. पूर्वीच्या धर्मशास्त्रज्ञांचा यालाच नेमका विरोध होता. गीतेतल्या वर दिलेल्या श्लोकाचा काही प्राचीन टीकाकारांनी कोणता अर्थ केला आहे हे पाहणे आपल्या दृष्टीने उद्बोधक होईल. त्या श्लोकात स्त्रिया, वैश्य, शूद्र यांच्या आधी जो पापयोनयः असा शब्द आला आहे तो स्वतंत्र जातीचा द्योतक नसून स्त्रिया, वैश्य व शूद्र यांनाच- या सर्वांनाच- उद्देशून तो शब्द वापरला आहे, असे त्यांचे मत आहे, म्हणजे या तीन्ही जाती पापयोनी ठरल्या ! जे धर्मशास्त्रज्ञ समाजातल्या बहुसंख्य लोकांवर पापयोनी असा शिक्का मारतात त्यांना व्यक्ती हे अंतिम मूल्य आहे हा विचार कधीतरी पटणे शक्य आहे काय ? आणि हा विचार जेथे मान्य नाही तेथे स्वायत्त संस्था, लोकायत्त संस्था, प्रजासत्ताक राज्ये, लोकशाही यांचा विकास कधीतरी होणे शक्य आहे अशी आशा धरता येईल काय ?